कुत्र्यांच्या पाठलागाने बिबट्या झाडावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:45 PM2019-11-29T23:45:24+5:302019-11-29T23:45:40+5:30
सावंतवाडी : कारिवडे-गवळीवाडा येथे भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचा चक्क कुत्र्यांनी पाठलाग करताच बिबट्या थेट नारळाच्या झाडावर (माडावर) चढून जाऊन ...
सावंतवाडी : कारिवडे-गवळीवाडा येथे भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचा चक्क कुत्र्यांनी पाठलाग करताच बिबट्या थेट नारळाच्या झाडावर (माडावर) चढून जाऊन बसला. बराच वेळ कुत्रे खाली भुंकत होते. मात्र बिबट्या वर जाऊन बसल्याने अखेर कुत्रे निघून गेले पण बिबट्या बराच वेळ खाली येत नव्हता. अखेर त्याला एका काठीने ठोकरण्यात आल्यानंतर त्याने खाली उडी घेत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. त्यावेळी ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
कुत्रे आज जास्त भुंकतात याचे कारण काय? हे बघण्यासाठी भालेकर हे घराच्या मागे आले असता कुत्रे तोंड वर करून भुंकत होते. त्यामुळे त्यांनी वर बघितले असता नारळाच्या झाडात बिबट्याचे शेपूट दिसले. त्यांनी परिसरातील ग्रामस्थांना याची माहिती दिली. त्यानंतर उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी लागलीच वनविभागाचे एक पथक कारिवडे गवळीवाडा येथे रवाना केले. तोपर्यंत बिबट्या झाडावरच होता.
मात्र, कुत्रे भुंकण्याचे थोडे कमी झाले होते. त्यामुळे बिबट्याने पण सुटकेचा नि:श्वास सोडला होता. पण तो खाली येत नव्हता.
अखेर ग्रामस्थ व वनविभागाने या बिबट्याला काठीने ठोेकरण्याचा प्रयत्न केला. साधारणत: १५ फूटावर हा बिबट्या असल्याने काठीने त्याला ठोकरने सोपे झाले. त्यामुळे बिबट्याने माडावरून उडी मारत जंगलात पळ काढला. बिबटा माडावरून उडी मारत असतानाच अनेकजण घाबरून गेले होते. जर बिबट्या उलटा आपल्या दिशेने आला तर काय? होईल अशी भिती होती पण बिबट्याने जंगलात जाणे पसंत केले.
बिबट्याचा कुत्र्यांना चकवा
कारिवडे गवळीवाडा येथे गेले काही दिवस बिबट्याचा वावर होता. मात्र शुक्रवारी सकाळी बिबट्या भक्ष्याच्या शोधात लक्ष्मण भालेकर यांच्या घराच्या परिसरात आला होता. पण पहाटेची वेळ असल्याने त्याला तसे काही मिळाले नाही. मात्र या भागात मोठ्या प्रमाणात कुत्रे असल्याने त्यांनी बिबट्याला बघताच बिबट्याचा पाठलाग केला. कुत्र्याचा जमाव असल्याने आपणास भक्ष्य बनवतील या भितीने बिबट्याने कुत्र्यांना चकवा देत चक्क भालेकर यांच्याच नारळाच्या झाडावर चढून बसणे पसंत केले. मात्र कुत्र्यांनी खाली भुंकणे सुरूच ठेवले होते.