लेप्टोस्पायरोसिस, जलजन्य साथीचे आजार; सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३३ गावे जोखीमग्रस्त, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली माहिती

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 10, 2024 05:41 PM2024-07-10T17:41:21+5:302024-07-10T17:41:21+5:30

आरोग्य विभाग विशेष लक्ष देणार

Leptospirosis, a waterborne epidemic; 33 villages are at risk in Sindhudurg district | लेप्टोस्पायरोसिस, जलजन्य साथीचे आजार; सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३३ गावे जोखीमग्रस्त, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली माहिती

लेप्टोस्पायरोसिस, जलजन्य साथीचे आजार; सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३३ गावे जोखीमग्रस्त, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली माहिती

गिरीश परब

सिंधुदुर्ग: लेप्टोस्पायरोसिस व जलजन्य साथीचे आजार या कारणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३३ गावे जोखीमग्रस्त म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. या गावांमध्ये आरोग्य विभागाचे विशेष लक्ष असणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. धुरी म्हणाल्या, जिल्ह्यात सध्या कोणत्याही तापाची साथ नाही. परंतु सध्याचा काळ हा जलजन्य साथीच्या आजारांचा आहे. त्यामुळे घराशेजारी पाणी साचू देऊ नका, दर मंगळवारी घरातील पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ धुवून वाळत ठेवली पाहिजे. जेणेकरून डासांच्या अळ्या होणार नाहीत. जिल्ह्यात सध्या लेप्टोचे रुग्ण नाहीत. परंतु आमची यंत्रणा ॲक्टिव्ह मोडवर आहे.

गेल्या ३ वर्षांत लेप्टो व जलजन्य साथीचे आजार ज्या गावात उद्भवले होते, अशी गावे निश्चित करून त्या गावात विशेष लक्ष दिले जात आहेत. १ जुलैपासून दर आठवड्यातून एकदा शेतकरी, कामगार, मच्छीमार, गटारी कामगार, चालक, गवंडी यांना डोक्सीच्या कॅप्सूल देण्यात आल्या आहेत. जेणेकरून लेप्टो तापाला रोधक लागल्यास मदत होईल. जिल्ह्यात एकही ‘झिका’चा रुग्ण नसल्याचेही त्या म्हणाल्या.

मलेरियाचे २८ रुग्ण

डॉ. धुरी म्हणाल्या, सध्या जिल्ह्यात कोणतेही साथ नाही. परंतु भविष्यात येऊ शकते म्हणून आरोग्य विभाग सतर्क आहे. जूनअखेर मलेरियाच्या ५० हजार ७५६ संशयित रुग्णांची तपासणी केली असता २८ रुग्ण बाधित आढळले आहेत. सर्वाधिक ७ रुग्ण कणकवलीमध्ये आढळले आहेत. त्यानंतर दोडामार्गमध्ये एकच ठिकाणी ६ रुग्ण आढळले होते. सावंतवाडीमध्ये ३, वेंगुर्ला १, कुडाळ २, मालवण ५, देवगड ३, वैभववाडी १ रुग्ण आढळला आहे.

डेंग्यूचे ८ रुग्ण आढळले

डेंग्यूच्या ४५२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ८ रुग्ण बाधित आढळले होते. दोडामार्ग, कणकवली, सावंतवाडीमध्ये प्रत्येकी २ रुग्ण तर कुडाळ व मालवण येथे प्रत्येकी १ रुग्ण सापडला होता. माकड तापाच्या २३० संशयित रुग्णांची तपासणी केली होती, सुदैवाने यात सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. चिकनगुनियाच्या संशयित १०४ रुग्णांची तपासणीसुद्धा निगेटिव्ह आली आहे.

जोखीमग्रस्त ३३ गावे

वैभववाडी तालुक्यातील नापणे, कणकवली तालुका फोंडा, घोनसरी, बोर्ड वे, हरकुळ बुद्रुक, तरंदळे, साकेडी, डाबरे, वाघेरी, कासार्डे, मालवणमध्ये पळसम, कुडाळ तालुक्यात मोरगाव, पावशी मिटक्याचीवाडी, पोखरण, धुरी तेंबनगर, गोवूळवाडी, पांगरड, कडावल, टेंभगाव, वेंगुर्ला तालुक्यामध्ये वेतोरे, सावंतवाडीमध्ये पाडलोस, सातोसे, बांदा हॉस्पिटल कट्टा, शेरले, मलेवाड, दोडामार्ग तालुक्यात पाळये, पिकुळे, हेवाळे, हेवाळे गावठाण, केर, मांगेली, साटेली भेडशी, कुंब्रल यांचा समावेश आहे.

पूरबाधित क्षेत्रात मेडिकल कॅम्प घेणार..

जिल्ह्यात झालेल्या पूरस्थितीमुळे विहिरींमध्ये पाणी जाऊन विहिरी दूषित बनल्या आहेत. अशा विहिरींमध्ये सुपर क्लोरीन घालून पाणी पिण्यायोग्य करणार आहे. तर ज्या ठिकणी पूरस्थिती निर्माण झाली होती, अशा ठिकाणी मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत, जेणेकरून साथीच्या आजारांचा फैलाव होणार नाही, असेही धुरी म्हणाल्या.

Web Title: Leptospirosis, a waterborne epidemic; 33 villages are at risk in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.