देवकरांनी केल्या दीड तासांत १० शस्त्रक्रीया
By admin | Published: March 15, 2015 10:12 PM2015-03-15T22:12:48+5:302015-03-16T00:16:28+5:30
विद्यार्थ्यांची आरोग्य स्थिती नाजूक असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला व सहकाऱ्यांच्या मदतीने अवघ्या दीड तासांत या शस्त्रक्रीया यशस्वीरित्या पूर्ण केल्या
रत्नागिरी : लांजा तालुक्यातील प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यां आरोग्य तपासणीच्यावेळी हार्निया व अन्य आजार असलेल्या दहा विद्यार्थ्यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांना अनपेक्षितपणे शस्त्रक्रीया कराव्या लागल्या. या दहाही विद्यार्थ्यांची आरोग्य स्थिती नाजूक असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला व सहकाऱ्यांच्या मदतीने अवघ्या दीड तासांत या दहाही शस्त्रक्रीया यशस्वीरित्या पूर्ण केल्या. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत शालेय मुलांच्या आरोग्य तपासणीचा उपक्रम लांजा येथे राबविण्यात आला. या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी डॉ. देवकर हे लांजा येथे गेले होते. त्यावेळी तपासणी शिबिरात मुलांवर काही शस्त्रक्रीया कराव्या लागतील याची कल्पनाही त्यांना नव्हती. मात्र, तपासणीत दहा विद्यार्थी हे आजारी असल्याचे आढळून आले. त्यातील काहीना हार्नियाचा त्रास होता. त्यामुळे भूलतज्ज्ञ डॉ. केतकर यांच्या मदतीने त्यांनी शाळा व पालकांना विश्वासात घेऊन या शस्त्रक्रीया केल्याची माहिती त्यांनी दिली. आरोग्याबाबत ग्रामीण भागात अद्यापही जागृती म्हणावी तशी झालेली नाही. त्यामुळे मुलांच्या आरोग्याच्या तक्रारी दिसल्या की घरगुती व गावठी उपचार करून घेतले जातात. या मुलांना आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात नेले जात नाही. या पार्श्वभूमीवरच शासनातर्फे हा आरोग्य तपासणीचा उपक्रम शालेय पातळीवर सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही आरोग्याबाबत जागरुक राहण्याबाबतचे प्रबोधन सुरू झाले आहे. या मोहिमेदवारे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आजारी विद्यार्थ्यांवर उपचार व गरज पडल्यास आवश्यक शस्त्रक्रीयाही केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)