‘इको सेन्सेटिव्ह’च्या जनसुनावणीकडे राजापूरकरांची पाठ
By admin | Published: March 30, 2015 10:38 PM2015-03-30T22:38:16+5:302015-03-31T00:22:07+5:30
डरकाळ्या हवेतच विरल्या : तीव्र भावना अचानक झाल्या बोथट?
राजापूर : राजापूर शहराचा इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये समावेश करू नये, अशी गगनभेदी डरकाळी फोडणाऱ्या राजापूरच्या नागरिकांनी त्यासंदर्भात आयोजित केलेल्या जनसुनावणीकडे पाठ फिरवून आपण सेन्सेटिव्ह नसल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, त्या जनसुनावणीला उपस्थित लोकप्रतिनिधींनी भविष्यात राजापूर शहराला येणाऱ्या अडचणी मांडीत या शहराला इको सेन्सेटिव्ह झोनमधून वगळण्यात यावे, अशी मागणी केली.नगराध्यक्षा मुमताज काझी यांच्या उपस्थितीत नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात पार पडलेल्या जनसुनावणीसाठी नगरसेवक, मुख्याधिकारी रंजना गगे, नगर परिषदेचे सर्व अधिकारी, वनविभागातर्फे वनपाल आखाडे, राजापूरचे तलाठी यांच्यासह नागरिकांतर्फे व्यापारी संघाचे अध्यक्ष निजाम काझी, जयंत अभ्यंकर, धनंजय मराठे, अनंत देसाई, हसन मुजावर व अन्य नागरिक उपस्थित होते.राजापूर तालुक्यातील ४८ गावे इकोसेन्सेटिव्ह झोनमध्ये समाविष्ट असून, त्यासह संपूर्ण राजापूर शहराचाही समावेश झाल्याने भविष्यात शहराच्या विकासावर कमालीचा परिणाम होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. शासन धोरणानुसार हा झोन लागू करण्यापूर्वीजनसुनावणी घेऊन नंतर तो अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीची बैठक पार पडली व त्यामध्ये जनसुनावणी घेण्यात आली.यापूर्वी शहरातील नागरिकांना त्याबाबत पूर्ण कल्पना देण्यात आली होती. शिवाय नागरिकांच्या भावनादेखील तीव्र होत्या. परिणामी ही जनसुनावणी चांगलीच वादग्रस्त ठरेल, असे वाटत होते. तथापी प्रत्यक्षात किरकोळ अपवादवगळता नागरिकांनीच या जनसुनावणीकडे पाठ फिरवली व आपणच सेन्सेटिव्ह नसल्याचे दाखवून दिले. मात्र, उपस्थित किरकोळ नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी किल्ला लढवला व राजापूरला इको सेन्सेटिव्ह झोनमधून वगळण्यात यावे, अशी मागणी नेटाने लावून धरली. राजापूर शहराचे भौगोलिक क्षेत्र ६.१९ चौरस किलोमीटर असून, जर भविष्यात इथे इकोसेन्सेटिव्ह झोन लागू झाल्यास संपूर्ण शहराचाच विकास खुंटेल, अशी भीती लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. राजापूर शहरात गावठाण, शिवकालीन देवस्थान इनाम यासह पूररेषा यात समाविष्ट झाल्याने यापूर्वीच विकासाला इथे मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे एवढ्या कमी क्षेत्राच्या शहराला इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये समाविष्ट न करता त्यामधून वगळण्यात यावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली. यापूर्वी झालेला सॅटेलाईट सर्व्हेदेखीलचुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याची टीका बैठकीत करण्यात आली. यापूर्वी राजापूर नगर परिषदेच्या कौन्सिलच्या बैठकीत राजापूर शहराला इको सेन्सेटिव्ह झोनमधून वगळण्याबाबतचा एकमुखी ठराव करण्यात आला आहे. त्यानंतर जनसुनावणीतही तो झोन लागू केला जाऊ नये, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे आता राजापूरला इको सेन्सेटिव्ह झोनमधून वगळले जाते का? याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
जनसुनावणीसाठी स्थानिक पातळीवर नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत.
समितीच्या बैठकीत घेतली जनसुनावणी.
राजापूर नगर परिषदेच्या बैठकीत इको सेन्सेटिव्हमधून राजापूरला वगळण्याची मागणी.