वसतिगृहांकडे विद्यार्थ्यांची पाठ
By admin | Published: June 10, 2015 11:22 PM2015-06-10T23:22:50+5:302015-06-11T00:21:21+5:30
पाल्यासाठी सुविधा : सुविधेकडेही गांभीर्याने पाहण्याचा अभाव
रत्नागिरी : माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी अल्प शुल्कात तसेच शहिदांच्या मुलांसाठी मोफत असलेल्या चिपळूण आणि खेड येथील माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी उभारलेल्या वसतिगृहाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता या वसतिगृहांमध्ये इतर नागरिकांच्या पाल्यानांही यावर्षी प्रवेश दिला जाणार आहे.
खेड आणि चिपळूण तालुक्यात माजी सैनिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे शासनाने या दोन तालुक्यांतील माजी सैनिकांच्या मुलांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखाली चिपळूण येथे मुले आणि मुलींसाठी तर खेडमध्ये केवळ मुलांसाठी शासनाच्या मालकीच्या प्रशस्त इमारतीत वसतिगृह सुरू केले आहे.
चिपळूण येथील मुले आणि मुलींसाठी असलेल्या वसतिगृहाची प्रत्येकी ६० आणि ४० इतकी प्रवेशक्षमता आहे, तर खेडमध्ये केवळ मुलांसाठी असलेल्या वसतिगृहाची ६०ची क्षमता आहे. या वसतिगृहामध्ये आजी-माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांसाठी अत्यल्प शुल्कात प्रवेश, तर शहीद सैनिकांच्या पाल्यांसाठी, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांसाठी व माजी सैनिकाच्या अनाथ पाल्यांसाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
मात्र, ही सुविधा असूनही प्रवेश घेणाऱ्यांची संख्या अल्प आहे. या कार्यालयातर्फे माजी सैनिक किंवा त्यांच्या विधवा पत्नी, मुले यांच्यासाठी असलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी कल्याण संघटक महिन्यातून दोन दिवस प्रत्येक तालुक्याचा दौरा करतात. तरीही या वसतिगृहांसाठी प्रवेशित मिळत नाहीत.
त्यामुळे आता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून उपलब्धतेनुसार इतर नागरिकांच्या (सिव्हीलियन्स) पाल्यांना निर्धारित दर आकारुन वसतिगृहामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. या रकमेत निवासाची सोय, नाष्टा, जेवण, मनोरंजन, खेळ, ग्रंथालय इत्यादी बाबींचा समावेश असणार आहे.
वसतिगृह प्रवेश पुस्तिका संबंधीत वसतिगृह अधिक्षकांकडे उपलब्ध आहेत. सैनिकी मुलांचे वसतिगृह चिपळूण, सैनिकी मुलींचे वसतिगृह, चिपळूण आणि सैनिकी मुलांचे वसतीगृह, खेड येथे संपर्क साधावा आणि या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी असलेल्या वसतिगृह सुविधेकडे पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)