जगाला हेवा वाटेल असे कोकण निर्माण करू या: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 08:47 AM2023-06-07T08:47:06+5:302023-06-07T08:48:50+5:30
मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड प्रकल्पामुळे अंतर निम्म्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क, कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : समृद्धी महामार्गाप्रमाणेच मुंबई-सिंधुदुर्ग कोस्टल वे या ग्रीनफिल्ड महामार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किलोमीटरच्या समुद्रकिनारपट्टीवरून हा महामार्ग जाणार आहे. त्यामुळे प्रवासाला सध्या लागत असलेला कालावधी निम्म्यावर येईल. या महामार्गातून विकासाला मोठी चालना मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
कोकण सुजलाम् सुफलाम् करायचा आहे. त्यासाठी कोकण विकास प्राधिकरणाची निर्मिती केली आहे. काजूवर प्रक्रिया करण्यासाठी ११०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. भूविकास बँकेचे ९५०० कोटी रुपये माफ केल्याने त्याचा फायदा कोकणवासीयांनादेखील झाला आहे. याशिवाय विकासाच्या दृष्टीने राहिलेला बॅकलाॅग भरून काढून जगाला हेवा वाटेल असा कोकण निर्माण करू या, असे आवाहनही शिंदे यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आपण लोकांच्या हितासाठी काम करतोय. सर्वांसाठी काम करतोय म्हणून आपल्याकडे आलोय. सरकार आपल्या दारी आले आहे. केंद्र व राज्य दोन्ही सरकारे हातात हात घालून काम करीत आहेत. नारायण राणेंकडे असणाऱ्या उद्योग मंत्रालयाचा वापर करून स्वयंरोजगार प्रकल्प आणून लाखो लोकांना रोजगार देणारे हात या ठिकाणी निर्माण करू या.
राणे-केसरकर दिलजमाई
- २०१४ च्या निवडणुकीपासून नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यात मोठी राजकीय दरी निर्माण झाली होती.
- दोघेही एकमेकांवर तुटून पडायचे. परंतु, आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये केसरकर शिंदे सेनेमध्ये मंत्री झाल्यानंतर त्यांना भाजपचे नेते केंद्रीय मंत्री राणे यांच्याशी जुळवून घ्यावेच लागले.
- त्यामुळे सावंतवाडीतील कार्यक्रम असो किंवा कुडाळमधील कार्यक्रम, केसरकर व राणे एकाच व्यासपीठावर होते. त्यामुळे या दोन नेत्यांतील दिलजमाई झाल्याचे दिसले.