"मल्टीस्पेशालिटीचे राहू दे, आधी शवागृह तरी बांधा!",  राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2022 11:33 PM2022-09-25T23:33:07+5:302022-09-25T23:35:34+5:30

आम्हाला मल्टीस्पेशालिटी नको निदान चांगले शवागृह बांधून मृतदेहांची हेळसांड तरी थांबवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना केले आहे.

"Let the multispeciality stay, build the mortuary first!", demanded the Nationalist Congress | "मल्टीस्पेशालिटीचे राहू दे, आधी शवागृह तरी बांधा!",  राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी 

"मल्टीस्पेशालिटीचे राहू दे, आधी शवागृह तरी बांधा!",  राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी 

googlenewsNext

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हृदयरोग तज्ज्ञ नाही रूग्णालयात अनेक समस्या आहेत. आम्हाला मल्टीस्पेशालिटी नको निदान चांगले शवागृह बांधून मृतदेहांची हेळसांड तरी थांबवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना केले आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी हिदायतुल्ला खान, शहर अध्यक्ष देवा टेमकर, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, सायली दुभाषी, संतोष जोईल, बाबल्या दुभाषी, नवल साटेलकर, इफ्तिकार राजगुरू आदी उपस्थित होते. दळवी म्हणाले, मुंबईचे पालकमंत्री पद देऊन दीपक केसरकर यांचे कोणीतरी प्रमोशन केले आहे, असा टोला लगावत यामागे नेमका सूत्रधार कोण? याचा केसरकरांनीच शोध घ्यावा, आणि त्यापेक्षाही जिल्हा सोडून अन्य जिल्ह्याची जबाबदारी दिली, कशी याचे आत्मचिंतन त्यांनी करावे, असा चिमटा राष्ट्रवादी दळवी यांनी काढला. 

येथील उपजिल्हा रुग्णालय वारंवार विविध समस्यांच्या गर्तेत आहे. रुग्णालयात उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक आमदार अपयशीच आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होते. तज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना बांबूळी किंवा खाजगी रुग्णालयाचा सल्ला दिला जातो. मात्र नातेवाईकांची परिस्थिती नसल्यास त्यांच्याकडून स्वतःच्या जबाबदारीवर रुग्णालयात रुग्ण ठेवत असल्याचे पत्र लिहून घेऊन, उपचार दिले जात आहेत. अशी नाराजी सुद्धा अनेकांनी आमच्याकडे व्यक्त केली. याकडे आता निदान पालकमंत्र्यांनी तरी आरोग्य यंत्रणेचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली. तर उपजिल्हा रुग्णालयातील शवागृह गेले अनेक महिने बंद आहे. रुग्णांवर उपचार नको, निदान त्यांच्या मृतदेहांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी ते तरी दुरुस्त करावे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले, केसरकर यांनी मागच्या काही दिवसात शहरातील गल्लोगल्लीत दौरा केला. त्यामुळे त्यांना अनेक समस्या निदर्शनास आल्याच असतील. त्या सोडविण्यासाठी त्यांनी आता तरी प्रयत्न करावे. येथील मोती तलावाच्या फुटपाथची अद्याप दुरुस्ती झाली नाही. त्याचा त्रास तलावा काठी फिरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागतो. तर फुटपाथ खचलेल्या परिसरातून जाताना रस्त्यावरून चालावे लागते. एखाद्या भरधाव वाहनाची धडक बसून अपघात होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे, असे सांगत त्यांनी समस्यांचा पाढा वाचला.

Web Title: "Let the multispeciality stay, build the mortuary first!", demanded the Nationalist Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.