कोकणात रेल्वेसंख्या दुप्पट करू

By admin | Published: April 9, 2017 11:37 PM2017-04-09T23:37:22+5:302017-04-09T23:37:22+5:30

सुरेश प्रभू; सौंदळ रेल्वे स्थानकाचे गोव्यातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन

Let's double the railway in Konkan | कोकणात रेल्वेसंख्या दुप्पट करू

कोकणात रेल्वेसंख्या दुप्पट करू

Next



राजापूर/पणजी : मागील पंचवीस वर्षांत कोकण रेल्वेच्या अनेक समस्या कायम होत्या. त्यापैकीच एक असलेल्या सौंदळ स्थानकाचा प्रश्न मार्गी लागला आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, विद्युतीकरणाचे प्रश्न येत्या काही वर्षांत मार्गी लागतील. तसेच या मार्गावरून दुप्पट संख्येने रेल्वे धावतील असा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले.
राजापूर तालुक्यातील सौंदळ रेल्वे स्थानकाचे उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते गोवा येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडले, त्यानंतर ते बोलत होते. ओणीमधील श्री गजानन मंगल कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत, विधान परिषद सदस्या हुस्नबानू खलिफे, जिल्हा परिषदअध्यक्षा स्नेहा सावंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, शिक्षण सभापती दीपक नागले, राजापूरचे नगराध्यक्ष हनिफ काझी, कोकण रेल्वेचे प्रबंधक बाळासाहेब निकम, सौंदळ स्थानकासाठी आजवर सातत्याने प्रयत्न करणारे चंदूभाई देशपांडे, सभापती सुभाष गुरव उपस्थित होते. बहुतांशी राजापूर तालुक्याला उपयुक्त ठरेल, असे सौंदळ स्थानक असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी उपस्थितांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधताना स्पष्ट केले.
मागील २५ वर्षांत कोकण रेल्वेबाबत अपेक्षित बदल झाला नाही, त्या समस्या सोडविण्याचे काम आपण करीत असल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले. कोकण रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणासह विद्युतीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत, ती वेळीच मार्गी लागतील, असे सांगून भविष्यात या मार्गावरील धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या दुप्पट होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गोवा येथून सुरेश प्रभू यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या स्थानकाचे उद्घाटन केले. याबाबतचा जाहीर कार्यक्रम ओणीत पार पडला. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी सौंदळसाठी प्रयत्न करणारे चंदुभाई देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. केंद्र्रीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते सौंदळ स्थानकाचे उद्घाटन झाल्यानंतर सौंदळ स्थानकावरील तिकीट खिडकीचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष स्नेहा सावंत यांच्या हस्ते पार पडले. (प्रतिनिधी)
दोन रेल्वेगाड्यांना थांबा
सौंदळ स्थानकाचे उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणी दिवा-सावंतवाडी व रत्नागिरी-मडगाव अशा दोन पॅसेंजर गाड्या थांबतील, अशी माहिती कोकण रेल्वेचे प्रबंधक बाळासाहेब निकम यांनी दिली. त्यानुसार सायंकाळी मुंबईवरून आलेली दिवा-सावंतवाडी ही गाडी थांबताच उपस्थित सौंदळ व परिसरवासीयांनी त्या गाडीला पुष्पहार अर्पण करून स्वागत केले.

Web Title: Let's double the railway in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.