सहकार क्षेत्रातील धडाडी राजकारणातही दिसू दे
By admin | Published: June 21, 2016 12:44 AM2016-06-21T00:44:20+5:302016-06-21T01:18:41+5:30
सर्वपक्षीय नेत्यांकडून गौरव : विकास सावंत यांच्यावर कौतुकांचा वर्षाव
सावंतवाडी : विकास सावंत यांनी सर्वच क्षेत्रात अष्टपैलू कार्य केले आहे. त्यांनी आता सहकार व शिक्षणक्षेत्रातील धडाडी राजकारणातही दाखवावी. त्यांचे राजकारणातील भवितव्य उज्ज्वल आहे. भाईसाहेब सावंत यांचा वारसा त्यांनी कायम पुढे सुरू ठेवावा. अशा शब्दात सर्वपक्षीय नेत्यांनी विकास सावंत यांच्यावर स्तुतीसुमनांची उधळण केली. निमित्त होते सावंत यांचा गौरव समारंभ. सत्काराचा हा कार्यक्रम रविवारी रात्री येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या मैदानावर पार पडला.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, नगराध्यक्ष बबन साळगावकर, शिवाजी सावंत, शशिकांत सावंत, जिल्हा बँक संचालक प्रकाश परब, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, सावंतवाडी पालिकेतील नगरसेवक विलास जाधव, राजेंद्र मसूरकर, राजू पनवेलकर, अरूण भिसे, भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विक्रांत सावंत, काँग्रेस सरचिटणीस मंदार नार्वेकर, पंचायत समिती सदस्य अशोक दळवी, उपसरपंच अभय किनळोस्कर, संजय कानसे, आबा सावंत, चंद्रकांत नाईक, सुनील राऊळ, नकुल पार्सेकर, रेश्मा सावंत, बाळा गावडे आदी सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होती. माजी राज्यमंत्री प्रविण भोसले म्हणाले, विकास सावंत यांनी राजकारणापेक्षा शिक्षणक्षेत्रात चांगले कार्य केले आहे.
त्यांचे सहकार क्षेत्रातील काम राज्यात लक्षात ठेवण्यासारखे आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीत त्यांचा आदर्श प्रत्येकानेच घेतला पाहिजे. खरे राजकारण ५० वर्षानंतर सुरू होते. त्यामुळे विकास सावंत यांचे भविष्य उज्ज्वल आहे, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले. शिवाजी सावंत म्हणाले, विकास सावंत यांनी आता शिक्षण व सहकार क्षेत्रापुरते मर्यादित राहू नये. थेट राजकारणात यावे. त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे.
आमच्यासारखे सर्वपक्षीय नेते नेहमीच त्यांच्या पाठिशी उभे राहतील. नकुल पार्सेकर म्हणाले, राजकारणात ज्याचा आदर्श ठेवावा, असे व्यक्तिमत्व म्हणून आम्ही सावंत यांच्याकडे पाहतो. तसेच ते कुशल संघटक आहेत. त्यांच्याकडून भविष्याच्या राजकारणाची रणनीती सर्वांनी शिकावी. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी विकास सावंत यांच्या कार्याचे कौतुक केले. ते एवढी वर्षे राजकारणात आहेत. पण कधी नेत्यांच्या पुढे-पुढे करताना दिसत नाही. म्हणून ते मागे राहिले. साधे व्यक्तिमत्व, सरळ निर्णय घेणारा माणूस, कोणाच्या मागे न बोलणे हा त्यांचा स्वभाव असल्यानेच आज एवढी जनता त्यांच्यावर प्रेम करताना दिसली.
काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब म्हणाले, राजकारणात कोणतीही अडचण आली की ज्यांचा सल्ला घ्यावा, असे आमच्यासाठी ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे विकास सावंत होय. यावेळी सत्काराला उत्तर देताना विकास सावंत म्हणाले, जनतेचे एवढे प्रेम आहे, हे पाहून मी भारावून गेलो आहे. यापुढे सहकाऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे राजकारणात कायम राहून काम करेन. सर्वसामान्य जनतेला अभिप्रेत असे काम माझ्या हातून होईल, असा आशावाद विकास सावंत यांनी बोलताना व्यक्त
केला. (प्रतिनिधी)