सिंधुदुर्ग जिल्हा भाजपामय करूया ! एकजूटीने जनहीताची कामे करा :नारायण राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 12:18 PM2020-06-08T12:18:54+5:302020-06-08T12:19:58+5:30
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा भाजपामय करण्यासाठी प्रयत्न करा. असे आवाहन माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी भाजपा पदाधिकार व कार्यकर्त्यांना केले .
कणकवली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ६ वर्षात देशाच्या व देशवासीयांच्या प्रगतीसाठी यशस्वीपणे उत्तम काम केले आहे . त्यामुळे त्यांचे जागतिक नेता म्हणून जगभरात कौतुक होत आहे . पंतप्रधानांचे हे कार्य तसेच भाजपा पक्षाचे जनहीताचे आणि विकासाचे कार्यक्रम गावागावातील जनतेपर्यंत पोहचवा. तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा भाजपामय करण्यासाठी प्रयत्न करा. असे आवाहन माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी भाजपा पदाधिकार व कार्यकर्त्यांना केले .
भाजपाच्या सिंधू आत्मनिर्भर अभियानांतर्गत कणकवली येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकत्यांच्या बैठकीत खासदार नारायण राणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार नितेश राणे , भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली , माजी आमदार प्रमोद जठार , अजित गोगटें , अतुल काळसेकर , जिल्हापरिष अध्यक्षा समिधा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते .
नारायण राणे म्हणाले, सिंधुदुर्गात भाजपा हा संघटनात्मक दृष्ट्या एक नंबरचा पक्ष आहे . ग्रामपंचायतींपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांवर कार्यकत्यांनी एकजीव होऊन एकजूटीने जनहीताची कामे करून हा जिल्हा भाजपामय करू या. पक्षाने जनहीताचा तसेच आत्मनिर्भर बनण्याचा जो कार्यक्रम दिला आहे , तो जनतेपर्यंत गावागावात जाऊन पोहचवा .सर्वांनी एकजूटीने कार्य केल्यास सत्ताधारी विरोधकांना आपण पुरून उरू , प्रत्येकजण स्वतःच्या निवडणूकीत जसे विजयी होण्यासाठी काम करता , तसेच नियोजनबद्ध काम पक्षाचा जनहीताचा कार्यक्रम राबविताना करा .
पंतप्रधान मोदी यांचे काम मोठे आहे . ते कार्य जनतेपर्यंत पोहचवा . विरोधकांवर कडवटपणे टीका करा . जिल्ह्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारच्या निष्क्रीयतेविरोधात आंदोलने व्हायला हवीत . असे आवाहनही त्यांनी केले . नारायण राणे पुढे म्हणाले , सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी मंजूर झालेले १४४ कोटी रूपयांमध्ये कपात करण्यात आली असून त्यातील १४ कोटी रूपयांचा निधीच आलेला आहे . त्यापैकी २५ टक्के निधी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी खर्च करावयाचा आहे .
विकासासाठी १० कोटी रूपयेसुद्धा राहाणार नाहीत. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कामाने कर्तुत्वाने आणि जनसेवेची कामे करून लोकप्रियता मिळवावी . गावातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते चांगले काम करतात असे वातावरण निर्माण व्हायला हवे . त्यासाठी ग्रामस्थ व नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करा .
सहाकारी कार्यकत्यांशी प्रेमाने वागून त्यांच्याकडून काम करून घ्या . यापुढील होणाऱ्या सर्व सार्वजनिक निवडणूकीत आपण विजय मिळवू . त्यादृष्टीने तयारीला लागा . सिंधुदुर्ग जिल्हा भाजपामय व्हायला हवा . पंतप्रधानांचे कार्य तसेच भाजपाचे कार्यक्रम व विचार गावागावातील लोकांमध्ये गेले तर ते अशक्य नाही .
पक्षाला नावलौकीक मिळवून देणारे काम करा , या जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ता निष्ठेने व प्रामाणिकपणे त्याच्या कामातून पाठबळ मिळत आहे . तुमचे चांगले काम पाहून पक्षश्रेष्ठी कौतुक करतील असे काम करा . या जिल्ह्यातील पक्षाचे कार्यक्रम शिस्तबद्ध व नियोजनबद्ध व्हायला हवेत.
सिंधुदुर्गात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत . या कोरोनाच्या संक्रमन नष्ट करून कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणांना मदत करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले . प्रारंभी अतुल काळसेकर यांनी प्रास्ताविक केले . यावेळी आमदार नितेश राणे, राजन तेली , डॉ . मिलींद कुलकर्णी, डॉ . प्रसाद देवधर , प्रभाकर सावंत यांनीही मार्गदर्शन केले . माजी आमदार प्रमोद जठार यांनी आभार मानले .