करू पर्यावरण रक्षण!
By admin | Published: March 9, 2015 09:27 PM2015-03-09T21:27:03+5:302015-03-09T23:54:58+5:30
गोठे ग्रामपंचायतीचा उपक्रम : यंदाची होळी ठरली अनोखी
चिपळूण : मेलेल्या जनावरांची हाडे चघळल्याने जनावरांना होणाऱ्या बोटुलिनम रोग व इतर समस्यांची जाणीव ठेवून गोठे ग्रुप ग्रामपंचायतीने मेलेल्या जनावरांची हाडे होळीनिमित्त जाळून एका अनोख्या होळीने पर्यावरण संस्था जपण्यासाठी पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन गोठे ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश भावने यांनी केले. या कार्यक्रमात अनिल घाणेकर, सदानंद जोशी, कृष्ण दावंडे, शांताराम माळी, सर्व ग्रामस्थ व महिला मंडळ सदस्यांनी सहभाग घेतला होता. गोठे गु्रप ग्रामपंचायत (ता. मंडणगड) येथे या वर्षीच्या अनोख्या होळीमधून पाळीव प्राण्यांची, गिधाडांची व एकूणच पर्यावरण संस्थेची काळजी घेण्यात आली आहे. गोठे ग्रुप ग्रामपंचायतीच्या अखत्यारित मेलेली जनावरे उघड्यावर टाकली जातात. ही जनावरे गिधाडांचे प्रमुख खाद्य आहे.
३० ते ४० गिधाडांचा थवा एखादा मेलेला बैल २ ते ३ तासांच्या आत फस्त करु शकतात. गोठे, बोरखत, कुडावळे या भागात मेलेल्या जनावरांचे मांस खायला गिधाडे येतात. पण, अशा ठिकाणी हाडे मात्र तशीच शिल्लक राहतात. मेलेली जनावरे टाकण्याच्या जागेला सुरक्षित कुंपण नसेल तर त्या ठिकाणी भटके श्वान जाऊन मेलेल्या जनावरांची हाडे गावात जाण्याची शक्यता असते. शरीरातील फॉस्फरसच्या अभावामुळे जनावरेसुध्दा कधी कधी जनावरांची हाडे, सडक्या काठ्या, काही प्रकारचे दगड चघळताना आढळतात. अशा सडलेल्या वस्तूंवर क्लोस्टीडियम बोटुलिनम नावाचा जिवाणू वाढतो. या रोगाला जनावरे बळी पडतात. या रोगावर कुठलाही उपाय नसल्यामुळे जनावरांची काळजी घेणे, हा एकच उपाय आहे.
सह्याद्रीतर्फे या भागात गिधाड संवर्धन जनजागृती कार्यक्रमही घेण्यात आला आहे. त्यासाठी गावातर्फे मदत केली जात आहे. सह्याद्रीतर्फे आयोजित गिधाड संवर्धन स्पर्धेतही गोठे ग्रुप ग्रामपंचायत सहभागी झाली आहे. हे या स्पर्धेचे दुसरे वर्ष असून, इतर गावांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांचे मार्गदर्शन लाभले. श्रीवर्धन, चिरगाव, विहाळी, नाणेमाची, रानवडी, ताम्हिणीजवळील गाव येथे गिधाडांच्या वसाहती आहेत. गिधाडे खाद्य शोधण्यासाठी १०० किलोमीटरचे अंतरही सहज पार करु शकतात. मेलेली जनावरे पुरण्यासाठी मजूर लावून खड्डा करण्याचा अधिक आर्थिक भार शेतकऱ्यांना पडतो. कातळ भागात खड्डा करणे शक्य नसल्यामुळे मेलेली जनावरे उघड्यावर टाकण्याशिवाय पर्याय नसतो. अशा ठिकाणी सह्याद्रीतर्फे विविध कार्यक्रमांतून जनावरांच्या उपचारासाठी डायक्लोफेनॅक नावाचे औषध न वापरण्याबद्दल संदेश पोचवला जातो.
तसेच जनावरांची मोफत तपासणी शिबिर, जनावरांना दिलेल्या औषधांच्या नोंदी ठेवण्यासाठी सह्याद्रीतर्फे कार्डवाटपही केला जात आहे. एकूण ६० हून अधिक घरट्यांचे संरक्षण त्या त्या भागातील स्थानिकांच्या मदतीने केले जात आहे. आपल्या गावात गिधाड संवर्धनाचे काम हाती घ्यावे, असे आवाहन अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
३० ते ४० गिधाडांचा थवा मेलेला बैल २ ते ३ तासात फस्त करतो. गोठे, बोरखत भागात या गिधाडांचे प्रमाण मोठे असल्याने व तेथे हाडे शिल्लक राहात असल्याने हा उपक्रम राबविला जात आहे.