भारत महासत्ता होण्यासाठी प्रयत्न करूया!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2016 11:13 PM2016-04-14T23:13:26+5:302016-04-14T23:30:37+5:30
नारायण राणे : बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कणकवलीत अभिवादन रॅली
कणकवली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच भारत हा जगात आदर्श लोकशाही असलेला देश म्हणून लौकिकास पात्र ठरला आहे. त्यांनी भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून देशाला दिलेले विचार समानतेचे आहेत. हे विचार आपण आत्मसात करुन भारत देश महासत्ता बनण्यासाठी प्रयत्न करुया, असे आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे केले.
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कणकवली शहरातून अभिवादन रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप बुद्ध विहार येथे करण्यात आला. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर नारायण राणे बोलत होते.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, समाज कल्याण समिती सभापती अंकुश जाधव, बांधकाम सभापती दिलीप रावराणे, मधुसूदन बांदिवडेकर, अनुसूचित जाती जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, सचिव प्रदीप सर्पे, पंचायत समिती सभापती आस्था सर्पे, उपसभापती महेश गुरव, तालुकाध्यक्ष सुरेश सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी नारायण राणे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आपल्यासमोर आहे. त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानामुळेच आदर्श लोकशाही येथे निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांचे ऋण कधीही विसरता येणार नाहीत.
देशात समानता यावी म्हणून त्यांनी केलेले कार्य सर्वांनाच उपदेशात्मक आहे. असे असतानाच काही लोक घटना दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बाबासाहेब हे देशाच्या हितासाठी झटले. समानतेसाठी झटले हे विसरून चालणार नाही.
बाबासाहेब म्हणजे दैवी शक्ती होती. उपेक्षित समाजाला, शिक्षणापासून दूर असलेल्या दलित समाजाला शिका आणि प्रगती करा असा संदेश त्यांनी दिला. त्यांचे अनुयायी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात प्रगती करत आहेत. बाबासाहेबांनी दिलेल्या उपदेशाचा ते योग्य उपयोग करीत आहेत. हे चांगले आहे. आपणही बाबासाहेबांचे स्मरण करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया, असेही राणे म्हणाले.
प्रास्ताविक संदीप कदम यांनी केले. तर आभार अंकुश जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुसूदन बांदिवडेकर व राजेश कदम यांनी केले.
यावेळी विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावरुन बुद्ध विहारापर्यंत काढण्यात आलेल्या शोभायात्रेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित विविध चित्ररथ सहभागी झाले होते. (वार्ताहर)