एक दिवस छोट्यांचा -खाऊ गल्ली उपक्रमाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 10:01 AM2019-11-21T10:01:23+5:302019-11-21T10:03:24+5:30
पारंपारिक उपक्रमांबरोबरच नवीन उपक्रम राबवून कणकवली शहराचा फक्त जिल्ह्यातच नव्हे तर जागतिक स्तरावर एक वेगळा ठसा उमटावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया . असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी येथे केले.
कणकवली : नगरपंचायत निवडणुकीच्यावेळी आम्ही दिलेल्या आश्वासनांप्रमाणे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि त्यांचे सहकारी नवनवीन संकल्पना राबवून शहरवासीयांना सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. पारंपारिक उपक्रमांबरोबरच नवीन उपक्रम राबवून कणकवली शहराचा फक्त जिल्ह्यातच नव्हे तर जागतिक स्तरावर एक वेगळा ठसा उमटावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया . असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी येथे केले.
कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून जानवली नदीवरील गणपती सान्यावर समीर नलावडे मित्रमंडळ आयोजित 'एक दिवस छोट्यांचा ( खाऊ गल्ली )' या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संदेश सावंत, राजश्री धुमाळे, नगरसेविका सुप्रिया नलावडे, कविता राणे, प्रतीक्षा सावंत, संजीवनी पवार, नगरसेवक संजय कामतेकर, अभिजित मुसळे, बंडू हर्णे, विराज भोसले, अबीद नाईक, बंडू गांगण, संदीप नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले, कणकवलीतील मुलांसाठी समीर नलावडे यांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. यासारखेच नवनवीन आणि सामाजिक उपक्रम राबविणे गरजेचे आहे. पाच वर्षाच्या कालावधीत कणकवली शहरात आम्ही काही तरी वेगळे करून दाखवू असा शब्द आम्ही मतदारांना दिला होता. त्याची पूर्तता या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे.
प्रमोद जठार यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच बच्चे कंपनीला 'धमाल करा.' असे आवाहन केले.
खाऊ गल्ली या उपक्रमाला कणकवली वासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने त्यात सहभाग घेतला होता. त्यामुळे जानवली गणपती सान्याला जत्रेचे स्वरूप आले होते. यावेळी समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने मुलांसाठी विशेष कुपन वाटप करण्यात आले होते. ज्यामुळे मुलांनी आवडीचे खाऊ खाण्याचा आनंद घेतला. तर ' जादूगार वैभव ' यांनी विविध जादूचे प्रयोग सादर करून बच्चे कंपनीची विशेष दाद मिळविली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले.
-- फोटो ओळ - कणकवली येथील जानवली नदीवरील गणपती सान्यावर आयोजित ' एक दिवस छोट्यांचा ( खाऊ गल्ली )' या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमोद जठार , समीर नलावडे, सुप्रिया नलावडे, राजश्री धुमाळे आदी उपस्थित होते.