वृद्धाच्या खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप
By admin | Published: February 28, 2017 11:34 PM2017-02-28T23:34:47+5:302017-02-28T23:34:47+5:30
चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथील गुन्ह्याची घटना
रत्नागिरी : देवदेवस्कीच्या कारणावरून सुधाकर पाटील या वृद्धाचा कोयतीने निर्घृण खूनप्रकरणी प्रदीप मनोहर भाटकर (वय ३८, कळंबस्ते, तेलेवाडी) याला जन्मठेपची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. डिंगे यांनी मंगळवारी हा निकाल दिला. श्वान पथकातील सम्राटच्या मदतीने पोलिसानी काही तासांतच या खून प्रकरणाचा छडा लावून मुख्य आरोपीला अटक केली होती.
सुधाकर यशवंत पाटील (६५, कळंबस्ते, संगमेश्वर) हे गावठी दारू विक्रीचा धंदा करीत होते. त्यातूनच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत. २0१४ मध्ये प्रदीप भाटकरने सुधाकर पाटील याच्या घरी जाऊन भांडण केले होते. तू माझ्यावर देवदेवस्की करतोस त्यामुळे मी सारखा आजारी पडतो, असे सांगून त्याने सुधाकर यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर हा वाद मिटला होता.
१८ जानेवारी २०१५ ला सुधाकर पाटील हे नेहमीप्रमाणे उमरे येथे गावठी दारू विकून सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास उमरे ते कळंबस्ते असे चालत येत होते. ते मळदेवाडी येथील फाट्यावर आले असता प्रदीप भाटकर याने अचानक त्याच्या डोक्यात कोयतीने वार केले. हे घाव इतके वर्मी होते की, सुधाकर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. आपले वडील अजून कसे आले नाहीत म्हणून शोधण्यासाठी गेलेल्या वीरधवल पाटील याला कोणीतरी माणूस रस्त्याचा बाजूला पडला असल्याचे एका व्यक्तीने सांगितले. आपले वडील सुधाकर हेच रक्ताचा थारोळ्यात पडले असल्याचे त्याच्या लक्षात आले.
त्याने या गुन्ह्याची खबर तत्काळ संगमेश्वर पोलिस ठाण्याला दिली तत्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. खुन्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी श्वान पथकातील अनेक पदके मिळालेल्या श्वान सम्राट याला पाचारण केले. सम्राट खुन्याचा माग काढत प्रदीप भाटकर याच्या घरात शिरला. या खून प्रकरणातील खरा खुनी पोलिसांसमोर आला. त्याच्याकडून रक्तांनी माखलेले कपडे, चप्पल अशा वस्तू पोलिसांनी जप्त केल्या. या गुन्ह्याचे तपास अधिकारी एम. आर. चिखले यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. (वार्ताहर)