जनजीवन अद्यापही विस्कळीतच
By admin | Published: November 10, 2016 11:24 PM2016-11-10T23:24:00+5:302016-11-11T00:12:07+5:30
नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये गर्दी : नागरिकांच्या सकाळपासूनच रांगा, एटीएम सेंटर मात्र बंदच!
कणकवली : केंद्र शासनाने ५00 व १000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत गुरुवारी थोडीशी सुधारणा झाली होती. बँका सुरु करण्यात आल्याने सामान्य नागरिकांसह व्यापारी तसेच इतर व्यक्तींना काहीसा दिलासा मिळाला असला तरी एटीएम सेंटर मात्र बंदावस्थेत होते. सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारावर परिणाम झालेला दिसून येत होता. त्यामुळे जनजीवन काहीसे विस्कळीतच होते. जिल्ह्यात सर्वच ठिकाणच्या बँकांमध्ये सकाळपासूनच पैसे ५०० आणि १०० च्या नोटा बदलून घेण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केलेली दिसत होती.
शासनाने ५00 तसेच १000 च्या नोटा चलनातून रद्द केल्याने मंगळवारी रात्रीपासून सर्वत्र खळबळ उडाली. पैसे काढण्यासाठी एटीएम सेंटरमध्ये रात्रीच अनेक लोकांनी गर्दी केली होती. तर पैसे भरण्यासाठीही बँकांच्या ई-गॅलरीमध्ये रांगा लागल्या होत्या. बुधवारी बँका तसेच एटीएम सेंटर बंद असल्याने लोकांची गैरसोय झाली. व्यापारी तसेच किरकोळ वस्तूंचे विक्रेते, व्यावसायिक, पेट्रोलपंप चालक अशा सर्वांनीच ग्राहकांकडून ५00 तसेच १000 च्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. याचा जास्त फटका सामान्य जनतेला बसला.
बुधवारी रात्री सर्व बँका गुरुवारी सुरु ठेवण्यात येतील तसेच शुक्रवार, शनिवार, रविवारीही त्या सुरु राहतील असे शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले. त्यामुळे सामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळाला.
गुरुवारी राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांमध्ये जुन्या नोटा जमा करणे, नोटा बदलून घेणे, पैसे काढणे यासाठी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. अनेक बँकांमध्ये सकाळपासून देवघेवीच्या व्यवहारांसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. एटीएम सेंटर बंद असल्यानेही बँकेतील गर्दीत वाढ झाल्याचे दिसून येत होते. बँकांमध्ये व्यवहार करण्यासाठी सकाळपासूनच ग्राहकानी रांगा लावल्या होत्या. बँकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षा व्यवस्थाही कडक ठेवण्यात आली होती. तसेच एकंदर परिस्थितीवर पोलिस लक्ष ठेऊन होते. बाजारांमध्ये बुधवारच्या तुलनेत काहीशी उलाढाल झाली तरी अजूनही म्हणावी तशी स्थिती सुधारलेली नाही. नोटा रद्द करण्याच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनानेही विशेष काळजी घेतली होती. बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दुकानदारांचीही गोची
हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द झाल्यानंतर घराघरात असणाऱ्या नोटा आता दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये मोठ्या संख्येने येत आहेत. ज्याप्रमाणे लोकांना आपल्याकडील नोटा बदलून हव्या आहेत. त्या बँकांमध्ये मिळण्यासाठी मोठी अडचण आहे. कारण बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे दुकानांमध्ये खरेदीसाठी येणारे ग्राहक २0 रूपयांचे दूध किंवा १0 रूपयांचा वडापाव घेत आहेत आणि ५00 रूपयांची नोट काढत आहेत. त्यामुळे बाजारपेठांमधील व्यापारीही मेटाकुटीस आले आहेत. (प्रतिनिधी)
दोन हजार रूपयांच्या नोटेसह सेल्फी
हजार आणि पाचशे रूपयांची नोट व्यवहारातून काढून टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर गुरूवारी बँका सुरू झाल्यानंतर प्रथमच चार हजारच्या जुन्या नोटा देऊन नवीन नोटा घेण्यात आल्या.
यात अनेकांना केंद्र सरकारने काढलेल्या दोन हजारच्या नवीन नोटा मिळाल्याने त्यांना आनंद झाला. या नोटा सेल्फी स्वरूपात व्हॉट्सअॅपवर फिरत होत्या. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी गुरूवारी सर्वत्र नवीन नोटा आणि बंदी या विषयावरच सोशल मीडिया अग्रेसर होताना दिसला.
व्यापारावर परिणाम
५00 आणि १000 या नोटा बाद करण्याच्या निर्णयामुळे आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला आहे. बेकरी व्यावसायिक, हॉटेल तसेच बाजारपेठेतील दुकाने अशा विविध ठिकाणच्या व्यापारावर ५0 टक्के परिणाम झाला असल्याची प्रतिक्रिया अनेक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
बँकेतून फक्त ४000 रुपये
नोटा बदलून घेणारे तसेच पैसे काढणाऱ्या व्यक्तींना अनेक बँकांनी फक्त ४000 रुपयापर्यंतच रक्कम दिली. यामध्ये १0,२0, ५0,१00 रुपयांच्या नोटांचा समावेश होता.
पेट्रोल पंपावर
५00 साठी अडवणूक
पेट्रोल पंपावर ५00 ची नोट घेऊन सुटे पैसे परत देण्यास असमर्थता दर्शविली जात होती. तर काही पेट्रोल पंपांवर ५00 ची नोट स्वीकारली जात नव्हती. त्यामुळे किरकोळ वादावादीच्या घटनाही घडत होत्या.
गृहिणी हतबल
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील गृहिणी या नोटा रद्दच्या निर्णयाने जास्त हतबल झालेल्या दिसून आल्या. घर खर्चासाठी ५00 किंवा १000 रुपये आपल्याजवळ ठेवलेल्या गृहिणींची फार मोठी अडचण झाली. त्यांना त्या नोटा बदलून घेईपर्यंत उधारीवर जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यावाचून गत्यंतर नव्हते. त्यामुळे त्यांची धावपळ झाली.
ग्रामीण भागातील वृध्द महिलांनीही आपल्या जीवापाड जपून पुढील कालावधीसाठी काही रक्कम ठेवली होती. कुटुंबातील व्यक्ती अथवा नातेवाईकांनी दिलेले पैसे वेळप्रसंगी उपयोगी पडतील म्हणून जपून ठेवले होते. त्यामध्ये ५00 तसेच १000 रुपयांच्या नोटांचा समावेश होता. या नोटा आता बाद झाल्या आहेत. हे समजल्यावर त्यांचा गोंधळ उडाला आहे.