जनजीवन विस्कळीत
By admin | Published: June 8, 2015 12:01 AM2015-06-08T00:01:33+5:302015-06-08T00:49:33+5:30
मान्सूनपूर्व पाऊस : शिरगांव-निमतवाडीत संरक्षक भिंत कोसळली
शिरगाव : गेले तीन दिवस पडणाऱ्या मान्सूनपूर्व पावसामुळे शिरगाव दशक्रोशीतील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी शिरगाव निमतवाडी येथील ओहोळास एमआरईजीएस योजनेतून बांधण्यात आलेली संरक्षित भिंत कोसळली तर रविवारी देवगड-नांदगाव मार्गावर शिरगाव बौद्धवाडीनजीक वडाचे झाड मुळासकट रस्त्यावर उन्मळून पडले.
दरम्यान, देवगड तालुक्यासह मिठबांव- लोकेवाडी परिसरात पडलेल्या वादळी पावसामुळे येथील आशिष लोके यांच्या घराच्या पडवीवर आंबा कलमाची फांदी पडून १७ हजाराचे नुकसान झाले आहे. तलाठी सुदर्शन अलकुटे यांनी या घटनेचा पंचनामा केला.
संरक्षक भिंत जमीनदोस्त
शुक्रवारी सायंकाळपासून वीजेच्या गडगडाटासह पावसास सुरुवात झाली. त्यातच वारंवार वीज पुरवठाही खंडित होत होता. सायंकाळी देवगड तालुक्यातील शिरगाव निमतवाडी येथील ओहोळास नव्याने बांधण्यात आलेली संरक्षक भिंत अंशत: कोसळली तर शनिवारी पुन्हा पडलेल्या मुसळधार आणि वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे संपूर्ण संरक्षक भिंत जमीनदोस्त झाली. हे विकासकाम एमआरईजीएस योजनेतून करण्यात आल्याचे समजते. पहिल्याच पावसात ही संरक्षक भिंत जमीनदोस्त झाल्यामुळे येथील ग्रामस्थांत या विकासकामाच्या दर्जाबाबत उलटसुलट चर्चा होत
आहे. (प्रतिनिधी)
वड कोसळला
रविवारी पावसाने दुपारी १.३0 पासूनच सुरुवात केली होती. सायंकाळी ३.३0 वाजण्याच्या सुमारास सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे देवगड-नांदगाव मार्गावरील बौद्धवाडी नजीकचे वडाचे झाड मुळासकट रस्त्यावरच उन्मळून पडले. यात वीजवाहिन्या तुटल्या असून वीज वितरणचे नुकसान झाले आहे. मार्गावरच वडाचे झाड पडल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. गेले तीन दिवस वीज पुरवठा वारंवार खंडित झाला होता. मोबाईल सेवेतही वारंवार व्यत्यय निर्माण होत होता. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला तरी बाजारपेठेत मात्र शुकशुकाट होता.
वेंगुर्लेत घरावर माड कोसळला
वेंगुर्ले : वेंगुर्ले शहरासह तालुक्यात रविवारी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी वीज तारांवर झाडे पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. शहरातील आनंदीवाडी येथे माड मोडून घरावर पडल्याने घरात झोपलेला प्रवीण गंगाराम जाधव (वय ३५) हा युवक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले. तर घराचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.
रविवारी दुपारी सव्वातीन ते चार वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने वेंगुर्ले मठ मार्गे कांबळेवीर भागात भटवाडी, आडेली, वजराठ येथे झाडे मोडून रस्त्यावर पडली. वजराठ-देवसूवाडी येथील ज्ञानेश्वर वेंगुर्लेकर यांच्या घरालगतचा विद्युत खांब मोडून पडला. वीज ताराही तुटल्याने वीज मंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आनंदीवाडी येथील गंगाराम जाधव यांच्या घरावर माड पडून घरात झोपलेला प्रवीण जाधव याला मुका मार लागून तो बेशुद्ध पडला. नीलेश जाधव, केतन जाधव, श्रीकांत जाधव, गणपत जाधव यांनी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारांसाठी त्यांना गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले. वेंगुर्ले शहर तलाठी बी. सी. चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
भटवाडी समृद्धीनगर येथील हितेंद्र सावंत यांच्या घराचे, तर प्रभाकर मालवणकर यांच्या नवीन दुकानाचे सिमेंटचे पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेल्याने नुकसान झाले. नुकसानीच्या नोंदी वेंगुर्ले तहसीलदार कार्यालयात नैसर्गिक आपत्ती कक्षात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
वाघेरी येथे झाड कोसळले : फोंडाघाट येथे घरांचे नुकसान; वाहतूक विस्कळीत
कणकवली : कणकवली शहरासह तालुक्यात शनिवारी वादळीवाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. फोंडाघाट येथील काही घरांची अंशत: हानी होऊन नुकसान झाले. तर रविवारी सकाळपासूनच कणकवली शहरात काहीसे ढगाळ वातावरण होते. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हलक्याशा पावसाच्या सरीही कोसळल्या. तर देवगड-निपाणी रस्त्यावर वाघेरी गावच्या दरम्यान तीन ठिकाणी झाडे कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता.
मान्सूनपूर्व पावसाने सिंधुदुर्गात हजेरी लावली असून शनिवारी कणकवली शहरासह तालुक्याला पावसाने जोरदार झोडपले.
वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांच्या छपरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये फोंडाघाट येथील फोंडेकरवाडीतील विजय भिकाजी फोंडेकर यांच्या इंदिरा आवास घरकूल योजनेतील बांधलेल्या घराचे ४ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. तर वनिता शंकर जाधव यांच्या घराचे एक हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
वारगाव येथील बापू लक्ष्मण जाधव यांच्या घराच्या ५० कौलांची हानी झाल्याने १२०० रूपयांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यात आणखीन काही ठिकाणी नुकसान झाले असून रविवारी तहसील कार्यालयाला सुट्टी असल्याने त्याबाबतची नोंद होऊ शकलेली नाही. दरम्यान, कणकवली शहरात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.
दिवसभर अधूनमधून वीजप्रवाह खंडीत होत असल्याने अनेक आस्थापनांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागला. तर सायंकाळी पावणे चारच्या दरम्यान फोंडाघाट-कणकवली रस्त्यावर झाड कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. काही वाहनचालकांनी तसेच फोंडाघाट येथील हेल्प अकादमीच्या सदस्यांनी हे झाड बाजूला करुन रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. जोरदार वादळी वाऱ्यामुळे या दरम्यानच्या कालावधीत देवगड-निपाणी रस्त्यावरील वाघेरी गावाच्या दरम्यान तीन ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. याठिकाणीही काही ग्रामस्थ, वाहनचालक तसेच हेल्प अकादमीचे महेश सावंत, मितेश सापळे, अक्षय हुले, प्रथमेश रेवडेकर, रोशन पारकर, नाना नानचे, सुभाष वेंगुर्लेकर, अतुल पारकर आदींनी ही तिन्ही झाडे रस्त्यावरुन हटवून वाहतुकीसाठी रस्ता खुला
केला. (वार्ताहर)
वैभववाडी-फोंडा मार्ग दीड तास
ठप्प; एडगावात घरांचे नुकसान
चालक बचावला : पोलीस स्थानकाच्या आवारात झाड कोसळले
वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात रविवारी दुपारी झालेल्या वादळात आचिर्णे कडुवाडीनजिक झाड पडल्याने वैभववाडी- फोंडा मार्ग दीड तास ठप्प होता. तर पोलीस ठाण्याच्या आवारात कोसळलेल्या झाडापासून पोलीस वाहन चालक अमित खाडे सुदैवाने बचावले. शनिवारच्या वादळी पावसामुळे कोळपे, एडगावमध्ये घरांचे किरकोळ नुकसान झाले.
दुपारी ३.४५ वाजता तालुक्यात जोरदार वादळ झाले. त्यावेळी आचिर्णे कडुवाडी बसथांब्यानजिकच्या शंकर मंदिरासमोर आकेशियाचे झाड उन्मळून पडले. त्यामुळे वैभववाडी- फोंडा मार्गावरील वाहतूक तब्बल दीड तास ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ग्रामस्थ आणि प्रवाशांनी झाड हटवून मार्ग वाहतुकीस खुला केला. त्याचप्रमाणे कोकिसरे बांधवाडी येथे झाड पडल्याने तळेरे- वैभववाडी मार्गावर दोन तास एकेरी वाहतूक सुरू होती. जेसीबीच्या सहाय्याने बांधवाडीतील झाड हटविण्यात आले. उंबर्डे मार्गावर सोनाळी येथे दोन ठिकाणी झाडे पडल्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प होती.
अनर्थ टळला
वादळ सुरू असताना पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस कॉन्स्टेबल अमित खाडे बाहेरून आलेल्या मित्रांसमवेत गप्पा मारत होते. मित्रांची सुमो पोलीस ठाण्याच्या आवारातून बाहेर निघताच सुरूचे मोठे झाड उन्मळून पडले. त्यावेळी अमित खाडे अगदी तीन- चार फुटांवर होते. त्यामुळे ते सुदैवाने बचावले. तेच झाड काही वेळापूर्वी कोसळले असते तर ते सुमोवर पडून मोठा अनर्थ घडला असता. पोलीस ठाण्याच्या आवारात कोसळलेले झाड जेसीबीने हटविण्यात आले.
वीज गायब
शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसानंतर खारेपाटण वीज केंद्रात बिघाड झाल्यामुळे संपूर्ण वैभववाडी तालुक्यातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. २६ तास उलटून गेले तरी वीज पुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही. त्यामुळे हॉटेल, कोल्ड्रींग व्यावसायिकांना फटका बसला. (प्रतिनिधी)