वैभववाडीत जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 08:16 PM2019-07-12T20:16:33+5:302019-07-12T20:17:04+5:30
कुसूर सुतारवाडी येथेही नदीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कुसूरमार्गे तिरवडे वाहतूक ठप्प होती. ते जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आले.
वैभववाडी : मुसळधार पावसाने गुरुवारी सकाळपासून वैभववाडी तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले. पावसामुळे अनेक गावांतील रस्त्यांवर पुराचे पाणी आल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. दरम्यान करुळ येथे रस्त्यावर झाड कोसळल्याने वैभववाडी-कोल्हापूर मार्ग अर्धा तास ठप्प होता. पुराच्या पाण्यामुळे उंबर्डे नायदेवाडी, तिथवली-दिगशी या गावांचा काही तास संपर्क तुटला होता. सायंकाळी पावसाचा जोर कमी झाल्याने पूर ओसरला.
मुसळधार पावसामुळे तालुक्यात पूरसदृश्य स्थिती उद्भवण्याच्या शक्यतेमुळे अनेक शाळा दुपारीच सोडण्यात आल्या होत्या. सोनाळीतील अभिनव विद्यामंदीर परिसरात पुराचे पाणी घुसले होते. तालुक्यातील सर्वच नद्यांनी पूररेषा ओलांडली होती.
सकाळी सहा वाजल्यापासून कोसळणारी संततधार दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सुरुच होती. त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली. अनेक नद्यांचे पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे काही गावांत जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. कुसूर-नायदेवाडीकडे जाणाºया रस्त्यावर शुकनदीचे पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
दिगशी येथील कॉजवेवरुन मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत असल्याने या गावांचा इतर गावांशी असलेला संपर्क तुटला होता. वैभववाडी-उंबर्डे रस्त्यावर सोनाळी येथे पाणी आल्यामुळे काही काळ येथील वाहतूक ठप्प झाली. सोनाळी पुलावर पाणी चढल्याने सोनाळी-कुसूर वाहतूक ठप्प झाली. कुसूर सुतारवाडी येथेही नदीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कुसूरमार्गे तिरवडे वाहतूक ठप्प होती.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे करूळ येथे रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वैभववाडी-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली.
स्थानिक ग्रामस्थांनी झाड तोडून बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. तर भुईबावडा घाटात एका ठिकाणी छोटे झाड कोसळले होते. मात्र, त्याचा वाहतुकीवर कसलाही परिणाम झाला नाही. तरीही ते जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आले.
करुळमध्ये झाड कोसळून वैभववाडी-कोल्हापूर मार्ग ठप्प झाला होता तर दुसºया छायाचित्रात अभिनव विद्यामंदिरच्या आवारात पुराचे पाणी घुसले होते. तत्पूर्वी शाळा सोडली होती.