सिंधुदुर्ग : लाईफ टाईमला शासकीय योजना : दीपक केसरकर यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 02:59 PM2018-07-09T14:59:38+5:302018-07-09T15:02:00+5:30
माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या लाईफ टाईम रुग्णालयाबाबत मी कोणतेही चुकीचे विधान केले नसून, माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असा खुलासा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कुडाळ येथील महिला व बालकल्याण रुग्णालयाच्या नूतन इमारतीच्या पाहणीदरम्यान केला.
कुडाळ : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या लाईफ टाईम रुग्णालयाबाबत मी कोणतेही चुकीचे विधान केले नसून, माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असा खुलासा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कुडाळ येथील महिला व बालकल्याण रुग्णालयाच्या नूतन इमारतीच्या पाहणीदरम्यान केला. राणे यांच्या रुग्णालयाला लवकरच भेट देणार असून तेथेही शासकीय योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कुडाळ येथे शासनाच्यावतीने जिल्ह्यासाठी नव्याने विशेष महिला व बाल रुग्णालय होणार असून, या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या इमारतीची पाहणी पालकमंत्री केसरकर यांनी केली.
यावेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, अमरसेन सावंत, सभापती राजन जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक आदी उपस्थित होते. केसरकर यांनी सांगितले की, महिला व बाल रुग्णालयाच्या इमारतीचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.
येत्या तीन महिन्यांत सर्व काम पूर्ण होणार आहे. रुग्णालय लवकरात लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू असून, याठिकाणी शासकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांची नियुक्ती करण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे.
विधानाचा विपर्यास
नारायण राणे यांनी पडवे येथे सुरू केलेल्या रुग्णालयाच्या बाबतीत माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. मी तसे काहीही बोललो नव्हतो. मी त्यांच्या रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी शुभेच्छा दिल्या होत्या. लवकरच या रुग्णालयात शासकीय योजना सुरू होण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती केसरकर यांनी दिली.