सिंधुदुर्गनगरीत खड्ड्यांमुळे घेतला तरुणाचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:05 AM2019-11-22T00:05:15+5:302019-11-22T00:05:25+5:30
सिंधुदुर्गनगरी : रस्त्यावरील खड्डे चुकविताना दुचाकी पुलाच्या कठड्याला आदळून झालेल्या अपघातात तरुण ठार झाला. ही दुर्घटना बुधवारी रात्री येथील ...
सिंधुदुर्गनगरी : रस्त्यावरील खड्डे चुकविताना दुचाकी पुलाच्या कठड्याला आदळून झालेल्या अपघातात तरुण ठार झाला. ही दुर्घटना बुधवारी रात्री येथील गरुड सर्कलजवळ घडली. विशाल विवेक मलबारी (वय २८) असे मृताचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, विशाल मलबारी जिल्हा परिषद कॉलनी येधून मध्यरात्री १२ च्या सुमारास ओरोस बुदु्रक येथील घरी दुचाकीवरून जात होता. प्राधिकरण क्षेत्रातील गरुड सर्कलजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. येथील खड्डे चुकविताना विनोदचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे तो सुमारे २० ते २५ मीटर लांब जाऊन पुलाच्या कठड्याला आदळला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या कठड्याच्या खाली सुमारे ३० फुटाची दरी आहे. कठड्याला दुचाकी अडकल्याने सुदैवाने विशाल दरीत कोसळला नाही. मध्यरात्री या मार्गावर वर्दळ नसते मात्र, अपघातानंतर दुचाकीचे दिवे सुरुच राहिल्याने हा अपघात कळण्यास मदत झाली. गस्तीवर असलेल्या पोलीस हवालदार मोहन पेडणेकर यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याचा मृत्यू झाला.
प्राधिकरण अजून किती बळी घेणार ?
विशाल याच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकाराने नागरिक प्राधिकरणवर रोष व्यक्त करीत आहेत. प्राधिकरण अजून किती बळी घेणार ? असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. किमान आतातरी प्राधिकरणाने तातडीने खड्डे बुजवावेत अशी मागणी होत आहेत. याप्रकरणी मृत विशाल मलबारी याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.