दिग्गजांचे मताधिक्य घटणार

By admin | Published: June 14, 2015 01:50 AM2015-06-14T01:50:43+5:302015-06-14T01:50:43+5:30

चिपळूण अर्बन निवडणूक : अपक्षांचाही चंचूप्रवेश होणार?

Lifetime fringe | दिग्गजांचे मताधिक्य घटणार

दिग्गजांचे मताधिक्य घटणार

Next

चिपळूण : येथील अर्बन बँकेची निवडणूक उद्या रविवारी होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनलचे वर्चस्व कायम राहणार असले तरी काही अपक्षांनी प्रचारात आघाडी घेतल्याने त्यांचा चंचूप्रवेश होण्याची शक्यता आहे. सहकार पॅनलच्या दिग्गजांच्या मताधिक्यात घट होणार असून अंतर्गत नाराजीचा फटका त्यांना बसणार असल्याची चर्चा आहे.
चिपळूण अर्बन बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनल मजबूत स्थितीत उतरली आहे. या पॅनलचे प्रमुख शिवसेनेचे माजी आमदार बापूसाहेब खेडेकर, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष सुचय रेडीज, उमेश काटकर आणि काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय रेडीज आहेत. या सर्वांचे पक्ष वेगळे असले तरी अर्बन बँकेच्या हितासाठी व सहकारात राजकारण नको म्हणून त्यांनी सर्वपक्षीय मोट बांधून सहकार पॅनलची स्थापना केली आहे. त्या पॅनलमधून स्वत: संजय रेडीज, अनिल दाभोळकर, दिलीप दळी, सतीश खेडेकर, रहिमान दलवाई, मंगेश तांबे, निहार गुढेकर, मोहन मिरगल, डॉ. दिपक विखारे, धनंजय खातू, समीर जानवलकर, प्रशांत शिरगावकर, निलेश भुरण, राधिका पाथरे व गौरी रेळेकर हे उमेदवार आहेत. पूर्वी याच पॅनलचे सदस्य असणारे विद्यमान संचालक विलास चिपळूणकर यांनी नाराजीतून आपले स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. त्यांच्या पॅनलमध्ये चिपळूणकर यांच्यासह खालीद दाभोळकर, इम्तियाज परकार, प्रवीण तांबट, संदीप साडविलकर, सुरेखा खेराडे यांचा समावेश आहे. याशिवाय सचिन बाईत, समीर टाकळे, राजेश केळसकर व संदीप चिपळूणकर हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. केळसकर हे दोन मतदार संघातून निवडणूक लढवित आहेत. त्यांनी आपल्याबरोबर संदीप चिपळूणकर यांना घेतले आहे.
प्रचारात सहकार पॅनलने आघाडी घेतली आहे. शहरी भागात व ग्रामीण भागात त्यांनी स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवली आहे. परंतु, काही सहकाऱ्यांना उमेदवारी न मिळाल्याने किंवा बँकेच्या एकूण कारभारावर असणारी नाराजी, संचालकांबाबतचा आकस याचा फटका सहकार पॅनलला बसणार असून त्यांच्या मतांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. नवउदय पॅनलने आपल्यापरीने प्रचाराची धुरा सांभाळली असली तरी ग्रामीण भागात ते पोहचू शकलेले नाहीत. तरीही या पॅनलच्या सुरेखा खेराडे, विलास चिपळूणकर यांनी आव्हान निर्माण केले आहे. ते दोघेही ज्या उक्ताड प्रभागात राहतात, त्या गावात त्यांचे प्राबल्य निर्माण झाले आहे. गाव म्हणून स्थानिक पातळीवर त्यांचा पाठिंबा वाढला आहे. अविनाश केळसकर यांनी नगर पालिकेतील काही प्रकरणे बाहेर काढल्यामुळे लोकांसमोर एक वेगळी ‘इमेज’ निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांनाही मतदारांचा वाढता पाठिंबा मिळाला आहे. शिवाय काविळतळी भागात त्यांच्याकडे मताचा एक गठ्ठा आहे. शहरी भागात शिवसेनेने सहकार पॅनलशी काडीमोड घेतल्याने त्यांनी समीर टाकळे यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे काही कार्यकर्ते व पदाधिकारी सहकार पॅनलबरोबर असले तरी टाकळे यांना इतरांचा चांगला पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे टाकळे यांची लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे. मागील निवडणुकीत पराभव पत्करलेल्या टाकळे यांना या निवडणुकीत अधिक संधी निर्माण झाली आहे. चिपळूण बाहेरील मतदार संघात सचिन बाईत यांनी प्रचाराचे रान उठविल्याने ते किती मते घेणार यावरच सहकारच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.
सहकार पॅनलसाठी एकूणच वातावरण अलबेल वाटत असले तरी अंतर्गत नाराजी हा या पॅनलसाठी डोकेदुखीचा विषय आहे. या पॅनलच्या प्रमुखांनी आपले सर्वच्या सर्व उमेदवार निवडून यावेत यासाठी टोकाचे प्रयत्न केले आहेत. परंतु, एकूणच मतदार संघाचा आढावा घेतला तर एक-दोन अपक्ष बाजी मारण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Lifetime fringe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.