दारू विक्री जोरात, राज्यभरात नशामुक्ती प्रबोधनाचे कार्यक्रम ठप्प
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 24, 2024 06:57 PM2024-06-24T18:57:17+5:302024-06-24T18:57:34+5:30
केवळ नशाबंदी मंडळ राबविते उपक्रम
सिंधुदुर्ग : दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. अनेक कुटुंबे दारूमुळे उघड्यावर आली आहेत. त्यामुळे शासनाकडून नशामुक्तीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांमार्फत वर्षातून किमान तीनवेळा प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले जातात. पण कोरोनानंतर मागील तीन वर्षांपासून याबाबत शासनाने उदासीनता दाखविली असून नशामुक्ती कार्यक्रमासाठी अनुदान दिलेले नाही. त्यामुळे राज्यभरातच नशामुक्तीसंदर्भात जाणीवजागृती प्रबोधनाचे कार्यक्रम ठप्प झाले आहेत.
पथनाट्यातून जागर
शासनाकडून नशामुक्तीसंदर्भात तंबाखूमुक्त दिन, आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिन, महात्मा गांधी जयंती सप्ताहात दारूबंदीवर विशेष भर दिला जातो. यामध्ये सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालय, प्रमुख चौक, गावोगावी भारूड, कीर्तन, पथनाट्य, प्रवचन, पोस्टर या कार्यक्रमातून उपक्रम घेतले जातात. यासाठी संबंधित संस्थांना १० ते २० हजारांचे अनुदान दिले जाते. तेही मागील तीन वर्षांपासून प्राप्त झालेेले नाही.
तीन वर्षांपासून कीर्तन बंद
सामाजिक प्रबाेधन व्हावे या उद्देशाने आपल्याकडे अनेक वर्षांपासून कीर्तन, प्रवचनाची परंपरा आहे. राज्य शासनाने नशामुक्ती मंच स्थापन केला आहे. परंतु या मंचद्वारे सध्या गेल्या तीन वर्षांपासून प्रबोधनच बंद असल्याचे दिसून येत आहे.
कीर्तनकाराला मानधन किती?
शासनातर्फे ठिकठिकाणी प्रबोधनासाठी तयार करण्यात आलेल्या कीर्तनकारांना साधारण एका कार्यक्रमासाठी दोन ते चार हजार रुपये मानधन दिले जाते.
सामाजिक उपक्रम
शासनाकडून विविध सामाजिक उपक्रम राबवत नागरिकांसाठी जास्तीत जास्त महत्त्वाच्या योजना राबविल्या जातात. परंतु त्याचा उपयोग शेवटच्या नागरिकापर्यंत किती मोठ्या प्रमाणात केला जातो, हा एक वेगळा भाग आहे. असे असले तरी पुरातन काळापासून सुरू असलेली कीर्तन, प्रवचने अजूनही ग्रामीण भागात मोठ्या संख्येने केली जातात, त्यामुळे त्यांचा प्रचार अन् प्रसार मोठ्या प्रमाणात होत असतो. काही भागात तर वासुदेवांकडूनही प्रचार केला जातो. त्यांच्याकडून शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाते, त्याचे फायदे नागरिकांना सांगितले जातात.
केवळ नशाबंदी मंडळ राबविते उपक्रम
राज्य सरकारने नशाबंदी मंडळाचे अनुदान दिलेले नाही. तरी नशाबंदी मंडळाचे सभासद स्वखर्चातून विविध कार्यक्रम राबवित आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याला सलामच ठोकला पाहिजे.