Sindhudurg Crime: पशुखाद्याच्या ट्रकमधून दारू वाहतूक, साडे सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 05:55 PM2023-02-07T17:55:57+5:302023-02-07T17:56:27+5:30
या प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल
वैभववाडी : पशुखाद्याच्या ट्रकमधून सातारा येथे विनापरवाना साडेपाच लाखांची दारू वाहतूक करणारा ट्रक वैभववाडी पोलिसांनी पकडला. ही कारवाई रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास करुळ तपासणी नाक्यावर केली. ट्रकसह १७ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
याप्रकरणी ट्रकचालक आबासो राजाराम बाबर (रा. दाधोली, ता. पाटण, जि. सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रात्री करूळ तपासणी नाक्यावर रात्री ये-जा करणाऱ्या वाहनांची पोलिस शिपाई हरिश्चंद्र जायभाय हे तपासणी करीत होते. या दरम्यान रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास वैभववाडीहून (के.ए.-२२ २६२४) कोल्हापुरच्या दिशेने जात असलेला ट्रक तपासणी नाक्यावर आला. त्याला तपासणीकरिता जायभाय यांनी थांबवले. ट्रकचालक आबासो बाबर याच्याकडे तपासणीकरिता कागदपत्रांची मागणी केली.
यावेळी ट्रक चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर गाडीची तपासणी करताना ट्रकचा हौदा जाड ताडपत्री टाकून दोरीच्या साहाय्याने बांधून घेतला होता. जायभाय यांना याबाबतचा संशय आल्यामुळे त्यांनी पोलिस निरीक्षक अमित यादव यांना संबंधित घटनेची तत्काळ माहिती दिली.
त्यानंतर वैभववाडी पोलिस स्थानकातून पोलिस उपनिरीक्षक अमोल पाटील व पोलिस कृष्णांत पडवळ यांना तपासणी नाक्यावर पाठविण्यात आले. तेथून ट्रक चालकासह वैभववाडी पोलिस स्थानकात आणण्यात आला. पंचाच्या समक्ष ट्रकचा हौदा उघडण्यात आला. हौद्यात मागच्या बाजूला पशुखाद्य भरलेले होते. पशुखाद्याची पोती बाजूला केली असता आतमध्ये दारूचे लेबल असलेले बॉक्स सापडले. एकूण ५ लाख ३४ हजार रुपयांची दारू ट्रकमध्ये होती.
पोलिसांनी दारूसह १२ लाख रुपयांचा टाटा कंपनीचा ट्रक ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी ट्रकचालक आबासो राजाराम बाबर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वैभववाडी पोलिस निरीक्षक अमित यादव करीत आहेत.