आमदारांच्या यादीला राज्यपाल मंजूरी देतील; जयंत पाटील यांना विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 12:25 AM2020-11-09T00:25:29+5:302020-11-09T00:27:47+5:30
अण्णा हजारेच्या टिकेवर काय बोलायचे
सावंतवाडी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महाविकास आघाडी सरकार वर केलेल्या टिकेवर राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी उत्तर देण्याचे टाळत काय बोलायचे असा सवाल केला व हसतच प्रश्नाला बगल दिली मात्र यावेळी त्यांनी महाविकास आघाडीने राज्यपालांकडे दिलेल्या बारा उमेदवाराची यादी मंजूर करतील असा विश्वास ही व्यक्त केला.
मंत्री जयंत पाटील हे रविवारी सिंधुदुर्ग च्या दौऱ्यावर आले असता रात्री उशिरा सावंतवाडीत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या
निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत,माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,काका कुडाळकर,अबिद नाईक,पुंडलिक दळवी,रेवती राणे,प्रफुल्ल सुद्रिक आदि उपस्थीत होते. यावेळी मंत्री पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर कोणताही अन्याय केलेला नाही,अशा प्रकारे कोणीही मंत्री कोणाचे नुकसान करत नाही.त्यामुळे आपले अपयश झाकण्यासाठी कोण टीका करत असेल,तर आम्ही काय बोलणार,असा सवाल मंत्री पाटील यांनी दीपक केसरकर यांचे नाव न घेता उपस्थित केला.
दरम्यान सिंधुदुर्गातील अवैद्य धंदे रोखण्यासाठी दिवाळीनंतर एक्साईज आणि पोलीस खात्याच्या माध्यमातून जॉईंट ऑपरेशन राबविण्यात येईल.तर गरज असल्यास कायद्यात कठोरता आणली जाईल असे सांगितले.आगामी काळात राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीचा धर्म पाळला जाणार आहे.येणाऱ्या सर्व पुढील निवडणुका एकत्र येवूनच लढवू,असे संकेत मंत्री पाटील यांनी दिले.राज्यपाल नियुक्त आमदारांची यादीला राज्यपाल मंजूरी देतील आता पर्यंत राज्यपालांनी कधीही अशी यादी नाकारली नसल्याचे मंत्री पाटील म्हणाले.