शिवसेना उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर
By Admin | Published: January 18, 2017 11:58 PM2017-01-18T23:58:24+5:302017-01-18T23:58:24+5:30
विनायक राऊत : पहिल्या टप्प्यात ९0 टक्के उमेदवार; अखेरची यादी ३१ ला
रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या ९० ते ९५ टक्के उमेदवारांची पहिली यादी सोमवारी (दि. २३) जाहीर करण्यात येणार आहे. उर्वरित काही जागांवर मातब्बर इच्छुक उमेदवार असल्याने त्यातून मार्ग काढून अखेरची यादी ३१ जानेवारीपूर्वी जाहीर केली जाणार आहे, अशी घोषणा खासदार विनायक राऊत यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
यावेळी शिवसेनेचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख सचिन मुकादम, आमदार उदय सामंत, आमदार सदानंद चव्हाण, रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी, सेनेच्या जिल्हा महिला आघाडीप्रमुख शिल्पा सुर्वे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खा. राऊत म्हणाले की, शिवसेनेकडे यावेळी जिल्हाभरात उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांची संख्या खूपच मोठी आहे. सर्वच इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. निवडून येण्याची शक्यता किती आहे, याबाबत ग्रामपातळीवर शाखाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख यांच्याशी चर्चा करूनच उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी व नऊ पंचायत समित्यांच्या ११० जागांसाठी येत्या २१ फेबु्रवारीला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना स्वबळावर सत्तेत येण्यास सज्ज आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
आता युती अशक्य...
रत्नागिरी नगरपरिषद पोटनिवडणुकीवेळी शिवसेनेने भाजपसमोर युतीचा प्रस्ताव
ठेवला होता. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
परिणामी, नगरपरिषद निवडणुकीत युती झाली नाही. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत युती होणे अशक्य आहे.
शिवसेनेने स्वबळावर निवडणुकीची तयारी पूर्ण
केली आहे. एकहाती सत्तेच्या दिशेने सेनेची वाटचाल सुरू
झाली आहे, असेही एका
प्रश्नाच्या उत्तरात राऊत
म्हणाले.
विमानतळ धावपट्टी, टर्मिनलसाठी जागा हवी
रत्नागिरीतील तटरक्षक दलाच्या ताब्यात असलेल्या विमानतळाचा विमान वाहतुकीसाठी वापर करण्याकरिता केंद्र सरकार,
राज्य सरकार, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ व सर्व संबंधितांकडून परवानगी मिळाली आहे.
आता धावपट्टीची पूर्तता होणे बाकी आहे. वाढीव धावपट्टी
व टर्मिनलसाठी मिरजोळेच्या दिशेने आणखी १० एकर
जागेची आवश्यकता आहे. कोणत्याही स्थितीत २०१७ मध्ये रत्नागिरीतून विमान वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे राऊत म्हणाले.