साहित्यिक स्त्रियांचा इतिहास दडपला
By admin | Published: February 15, 2015 10:38 PM2015-02-15T22:38:45+5:302015-02-15T23:48:12+5:30
सतीश काळसेकर यांची खंत : वेंगुर्लेत आनंदयात्रीतर्फे साहित्य संमेलन
वेंगुर्ले : दैनंदिन जीवन आणि सर्जनशील लेखणी यातून साहित्यिक निर्माण होत असतो. अशाप्रकारची साहित्य संंमेलने दरवर्षी व्हावीत. वेंगुर्लेतील या साहित्य संमेलनामुळे येथील युवा पिढीला साहित्यिक होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. ही कौतुकाची बाब आहे. पूर्वी पुरुषांप्रमाणेच स्त्रियाही साहित्यिक झाल्या. परंतु त्यांचा इतिहास दडपून टाकण्याचा प्रकार घडला, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक व संपादक सतीश काळसेकर यांनी साहित्य संमेलनावेळी व्यक्त केली.सातेरी प्रासादिक संघ संचलित आनंदयात्री वाङमय मंडळाने वेंगुर्ले येथे आयोजित केलेल्या एक दिवसीय साहित्य संमेलनावेळी सतीश काळसेकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्योजक दादासाहेब परूळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व संमेलनाचे अध्यक्ष सतीश काळसेकर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे वेंगुर्ले अध्यक्ष देवदत्त परूळकर, संयोजन समिती अध्यक्ष वृंदा कांबळी, गटविकास अधिकारी बाबली वायंगणकर, सातेरी प्रासादिक संघाचे अध्यक्ष राजाराम नाईक, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी विजय गावडे, सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ महाले, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देऊलकर, नगरसेविका अॅड. सुषमा प्रभूगावकर, किरात ट्रस्टचे सचिव शशांक मराठे, बांधकाम व्यावसायिक सचिन वालावलकर आदी उपस्थित होते. संमेलनाच्या सुरुवातीला वेंगुर्ले येथील सरस्वती संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. वीरधवल परब यांनी संमेलनाचे अध्यक्ष सतीश काळसेकर यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविकात दादासाहेब परूळकर यांनी, युवकांनी मागे न राहता आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन वाटचाल करावी, असे सांगितले. कार्यक्रमाध्यक्ष सतीश काळसेकर म्हणाले, वेंगुर्ले गावाने मला आधार दिला आहे. त्यामुळे वेंगुर्लेबाबत भरपूर आठवणी आहेत.
येथील माझ्या नाळ पुरलेल्या जमिनीतील लोकांनी माझा जो आदर-सत्कार केला, त्याने मी भारावून गेलो आहे, असे उद्गार काढले.
शिक्षकांना समाजात किती मान आहे, हे आजच्या संमेलनाला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे समजले आहे.
संमेलनात कणकवली येथील विघ्नेश पुस्तक भांडार व किरात ट्रस्टने पुस्तक प्रदर्शन मांडले. ज्येष्ठ रांगोळीकार रमेश नरसुले यांनी आरती प्रभूंची काढलेली रांगोळी लक्षवेधी ठरली. (प्रतिनिधी)
मान्यवरांचा गौरव
संमेलनाचे औचित्य साधून साहित्य क्षेत्रातील व भाषा संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींमध्ये संस्कृत भाषा अभ्यासक रा. पा. जोशी, संत साहित्याचे गाढे अभ्यासक देवदत्त परूळकर, लेखक ना. शि. परब, साप्ताहिक किरातचे प्रकाश सुनील मराठे, समीक्षक अनिल सौदागर, कवी पुंडलिक शेट्ये, काव्य संग्रहकार गोविंद पायनाईक, ज्येष्ठ लेखिका उषा परब, कथा संग्रहकार लिलाधर घाडी, ज्येष्ठ संपादिका मीरा जाधव यांचा सतीश काळसेकर यांच्या हस्ते, तर सतीश काळसेकर यांचा दादासाहेब परूळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.