साहित्य दिंडीच्या सागरात न्हाली सुकळवाड-तळगावनगरी
By admin | Published: November 15, 2015 11:11 PM2015-11-15T23:11:54+5:302015-11-15T23:46:42+5:30
कोकण मराठी साहित्य परिषद : केशवसुत कोकण साहित्य यात्रा
मालवण : ढोल-ताशाच्या गजरात लेझीमच्या तालावर शेकडो शाळकरी विद्यार्थ्यांसह साहित्यिक आणि नागरिकांच्या उपस्थित निघालेल्या साहित्य दिंडीने मालवण वेशीवरील सुकळवाड-तळगाव गावे साहित्य सागरात न्हाऊन निघाली. खासदार विनायक राऊत यांनी तळगाव गावी केलेल्या साहित्यिकांच्या स्वागताने परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक भारावून गेले. कोकण विशाल मनाचा प्रांत असल्याचे सांगत कोकणची साहित्य श्रीमंती आम्ही साहित्यिक वाढवतो. कोकणचा आर्थिक अनुशेष खासदार राऊत यांच्यासारखे प्रामाणिक लोकसेवक भरून काढत आहेत, अशा शब्दात कर्णिक यांनी भावना व्यक्त केल्या.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन २० ते २२ नोव्हेंबर या कालावधीत मुंबई-दादर येथे आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या वातावरण निर्मितीसाठी साहित्य यात्रा आयोजित केल्या जात आहेत. रविवारी सकाळी कणकवली-करूळ येथे उद्घाटन करण्यात आलेली केशवसुत कोकण साहित्य यात्रा दुपारी सुकळवाड-तळगावला पोहचली. यावेळी साहित्य यात्रेचे दमदार स्वागत करण्यात आले. सुकळवाड बाजारपेठ येथून साहित्याची पदयात्रा वाजत गाजत तळगाव वेशीवर पोहोचली. गावातील श्री देव रामेश्वर मंदिरात यानिमिताने रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिकांचा सत्कार खासदार विनायक राऊत यांच्यासह गावच्यावतीने करण्यात आला.
यावेळी साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्यासह खासदार विनायक राऊत, विश्वस्त भास्करराव शेटये, अरुण नेरुरकर, माजी आमदार शिवराम दळवी, एल. बी. पाताडे, मालवणी कवी रुजारिओ पिंटो, नमिता कीर, एम. जी. मातोंडकर, सतीश गवाणकर, अनुपम कर्णिक, सुरेंद्र दळवी, वर्षा कुडाळकर, वृंदा कांबळी, वैशाली पंडित, अरुण मर्गज, जिल्हा परिषद सदस्य जान्हवी सावंत, मधुसूदन नानिवडेकर, कल्पना बांदेकर, प्रसाद दळवी, राजेश रेगे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजय पडते, अभय शिरसाट, मंदार शिरसाट, बबन शिंदे, हरी खोबरेकर, हर्षद गावडे, नागेंद्र परब, सुकळवाड सरपंच सचिन पावसकर, तळगाव सरपंच शारदा पेडणेकर, ओरोस सरपंच मंगला ओरोसकर, विद्याधर देसाई, रुपेश राऊळ, राजू शेट्ये आदी मान्यवर व साहित्यिक उपस्थित होते. यावेळी पेंडूर हायस्कूलच्या लेझीम पथकाने विविध कला सादर केल्या. (प्रतिनिधी)
साहित्य संमेलनाची सलामी
यावेळी बोलताना कर्णिक म्हणाले, साहित्यातून जीवन श्रीमंत होते. अंधाराची वाटही प्रकाशाकडे घेवून जाते. कोकणच्या ज्या गावाने खासदार, आमदार, महापौर दिले या छोट्याशा तळगाव गावात साहित्य यात्रेचे झालेले भव्य स्वागत म्हणजे मुंबईतील साहित्य संमेलन यशस्वीतेची सुरुवात म्हणावी लागेल. तर खासदार राऊत म्हणाले, साहित्य दिंडी आपल्या सिंधुदुर्गातून जात आहे याचा अभिमान आहे. साहित्याची वाटचाल अशीच सुरु राहील, भावी पिढीलाही साहित्याची ओळख जवळून होण्यासाठी सुकळवाड-तळगाव येथील शालेय विद्यार्थ्यांची सहल साहित्य पंढरी मालगुड-रत्नागिरी येथे नेली जाईल, असेही त्यांनी सांगितले.