शेतकऱ्यांसाठी ‘थोडी खुशी, बडा गम’

By admin | Published: November 29, 2015 09:22 PM2015-11-29T21:22:32+5:302015-11-30T01:15:21+5:30

भातपीक हंगाम उरकला : उन्हाळी शेतीकामांना वेग; खळ्यावरील मळणी इतिहासजमा

'A little happiness, big gum' for farmers | शेतकऱ्यांसाठी ‘थोडी खुशी, बडा गम’

शेतकऱ्यांसाठी ‘थोडी खुशी, बडा गम’

Next

सुरेश बागवे -- कडावल--परिसरात खरीप भातपिकाचा यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी कसोटीचा ठरला. पाऊस व सदृश वातावरणाने भातपिकाच्या अंतिम हंगामालाही शेतकऱ्यांसाठी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यंदाच्या भातपिकाच्या हंगामात शेतकऱ्यांना ‘थोडी खुशी, बडा गम’चा अनुभव आला आहे. सध्यातरी भातकापणीचा हंगाम पूर्ण झाला असून उन्हाळी शेतीकामात शेतकरी गुंतला आहे. दरम्यान, यंदाही अनेक शेतकऱ्यांनी खळ्यावरच्या मळण्यांना ‘बगल’ दिली आहे.
परिसरातील खरीप भातकापणीचे काम पूर्ण झाले आहे. भातकापणी संपल्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असला, तरी हा हंगाम शेतकऱ्यांसाठी विशेष सुखावह झाला नाही. हंगामाच्या सुरुवातीपासूनच निसर्गाच्या प्रतिकूलतेचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. भात लांबणीच्या कालावधीत पाऊस गायब झाल्यामुळे कामे बरेच दिवस खोळंबून राहिली. मधल्या काळात शेतीयोग्य पाऊस पडल्याने शेतकरी खुशीत होते. मात्र, नंतर भातकापणीवेळी पावसाने पुन्हा डोके वर काढले. सातत्याने काही दिवस पाऊस पडल्याने भातपिकाची मोठी हानी झाली. भाताबरोबरच सरलाही कुजून गेल्यामुळे पुढील काळात गुरांच्या वैरणीचीही चणचण भासणार आहे.निसर्गाच्या फटक्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना यंदा भात बियाण्यांनीही दगा दिला. येथील शेतकऱ्यांनी यंदा सुधारित व संकरित भातबियाण्यांचा वापर पेरणीसाठी केला होता. यापैकी काही तुरळक बियाण्यांची उगवण योग्य प्रमाणात झाली नाही, तर काही संकरित बियाणी भेसळयुक्त सिद्ध झाली आहेत. पारंपरिक भाताच्या जातींसह एककाडीसारख्या काही संकरित वानांनी मात्र मदतीचा हात दिला आहे. एकंदरीत यंदाचा खरीप भात हंगाम शेतकऱ्यांसाठी कसोटीचा ठरला. दरम्यान, पाऊस व पाऊससदृश वातावरण असूनही त्यास हुलकावणी देऊन शेतकऱ्यांनी भातकापणी पूर्ण केली आहे. आता ते उन्हाळी शेतीसंबंधीच्या नियोजनात गुंतले आहेत.


खळ्यावरील मळणी इतिहासजमा
पूर्वी शेतकरी भातकापणी हंगामात दिवसभरात भातकापणी, खळवटणी करून रात्री उशिरापर्यंत भाताची झोडणी करत असत. गवत वाळवण्यासारखी इतरही बरीच कामे त्यांना दिवसा करावी लागायची.
दिवसभराच्या श्रमाने अंग तिंबून गेल्यानंतरही भल्या पहाटे खळ्यावर मळण्या काढल्या जात. पहिला कोंबडा आरवला की, साधारण: चार वाजता मळणीला बैल जुंपले जात. शेतकऱ्यांचा दिवस तेव्हा पहाटे चार वाजता सुरू होत असे. खांब्याभोवती मळणीचे बैल फिरू लागले की, खळ्यावर चैतन्य पसरे.
काहीवेळा शेतकरी आळीपाळीने एकमेकांच्या खळ्यावर मळण्या काढत असत. यासाठी मग पाहुणचाराचे बेत आखले जात. अस्सल गावठी कोंबडीच्या फक्कड रश्श्यासह वड्यांवर आडवातिडवा हात मारला जाई. आता मात्र मळणी इतिहासजमा होऊ लागली आहे. मळणीविना खळे सुनेसुने होऊ लागले आहे.

Web Title: 'A little happiness, big gum' for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.