पेंडखळेत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान
By admin | Published: June 14, 2015 01:50 AM2015-06-14T01:50:45+5:302015-06-14T01:50:55+5:30
जंगलात सोडले : वन अधिकाऱ्यांनी वाचविले
राजापूर : भक्ष्याचा पाठलाग करताना चुकून विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या बाहेर काढून जीवदान दिले. ही घटना पेंडखळे गावातील चिपटेवाडीत घडली.
पेंडखळे चिपटेवाडीतील केशव सोनू कांबळे यांच्या घरानजीकच्या विहिरीत शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान हा बिबट्या पडला. ही बाब शनिवारी सकाळी लक्षात आली. आपल्या विहिरीतून काहीतरी जोरात आवाज येत असल्याचे कळताच कांबळे यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना बिबट्या उड्या मारताना आढळला. सुमारे ६० फूट उंचीची ही विहीर असून त्यामध्ये आणखी एक छोटी पोटविहीर आहे. मुख्य विहिरीत पाणी नसल्याने बिबट्या तेथे उड्या मारत होता.
गावचे पोलीसपाटील विजय चिपटे यांना ही खबर देण्यात आली. त्यानंतर पोलीसपाटलांनी वनविभागाचे वनपाल सुधाकर गुरव यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. थोड्या वेळातच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. त्यांनी समवेत आणलेला पिंजरा त्या विहिरीत सोडला व बिबट्याला आतमध्ये यशस्वीरीत्या बंदिस्त केले. नंतर त्या बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली व तो सुरक्षित असल्याचे सांगितले.
विहिरीत पडलेला बिबट्या हा सहा वर्ष वयाचा असून तो नर आहे. त्याची लांबी १८५ सें. मी. तर ३८ सें.मी. उंची आहे. दोन्ही पायाची नखे परिपक्व आहेत, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी चिपळूणचे विभागीय वन अधिकारी अमर साबळे, राजापूरचे वनपाल सुधाकर गुरव, रत्नागिरी परिक्षेत्राचे वनपाल स. म. गावकर, वनरक्षक सागर गोसावी, वनविभागाचे कर्मचारी विजय म्हादये, दीपक म्हादये, दीपक चव्हाण यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. या बिबट्याला नंतर नेहमीप्रमाणे नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडण्यात आले.
चालू वर्षात चार ते पाचवेळा असे प्रकार घडले असून, ओणीमध्ये एका विहिरीत तर ब्लॅक पँथर विहिरीत पडला होता. (प्रतिनिधी)