CoronaVirus Lockdown : आंब्याच्या पेटीमागे लपलेले पुण्यातील प्रवासी पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 10:57 AM2020-04-13T10:57:49+5:302020-04-13T11:47:20+5:30
महाराष्ट्र सरकारने राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले असले तरी सिंधुदुर्गमधील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल केले जाईल. मात्र, सीमाबंदी कायम राहणार आहे, असे सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संकेत दिले आहेत.
कणकवली : देशभरात लॉकडाऊन व जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश लागू असताना जिल्ह्याच्या सीमांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांची टीम येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करीत आहे.
याच पार्श्वभूमीवर फोंडाघाट चेकनाक्यावरून जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू असतानाच पोलीस निरीक्षक शहानवाज मुल्ला यांच्यासह पोलीस नाईक अमित खाडये यांना गोव्याकडून कोल्हापूरला जाणाऱ्या चारचाकीतून (एम. एच. १४, जी. यू. ३९८८) चालकासह अन्य तीन प्रवासी प्रवास करताना आढळून आले.
चौकशी दरम्यान ते गणेश रावसाहेब दिघे (३९) व भीमाशंकर अर्जुन टाफळकर (४०) हे पुणे येथील असल्याचे समजले. मात्र, मालवाहतुकीसाठी शासनाचा अधिकृत परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वाहनामध्ये शासनाच्या परवानगीशिवाय जास्त व्यक्तींची वाहतूक कशी करता? असे विचारले असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.
त्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना गाडीसह कणकवली पोलीस स्थानकात आणले व त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे पाठविण्यात आले आहे. कोरोना आजाराचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिंधुदुर्ग यांचेकडील मनाई आदेशानुसार लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अमित पंढरीनाथ खाडये यांनी कणकवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
आंब्याच्या पेटीमागे लपलेल्यांना पकडले
चौकशी दरम्यान वाहन चालकाचे नाव सागर दत्तात्रय पवाले (३५, रा. चाकण, माणिक चौक, पुणे) असे सांगण्यात आले. तर चालकाच्या बाजूस असलेल्याचे नाव तुषार चंद्रकांत देवडकर (रा. माणिक चौक, चाकण) असे आहे. मात्र, गाडीची तपासणी केली असता गाडीच्या मागील हौद्यात आंब्याच्या बॉक्सच्या मागे दोन व्यक्ती लपून बसलेल्या पोलिसांना आढळून आल्या.