बांगलादेशी महिलांकडून वेश्याव्यवसाय प्रकरणी कणकवलीतील लॉजच्या मालकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 14:23 IST2025-01-24T14:23:17+5:302025-01-24T14:23:57+5:30
तीन दिवसांची पोलिस कोठडी; नागवे रस्त्यावरील रेल्वे पूलानजीक घेतले ताब्यात

बांगलादेशी महिलांकडून वेश्याव्यवसाय प्रकरणी कणकवलीतील लॉजच्या मालकाला अटक
कणकवली: कणकवली शहरात पकडलेल्या बांगलादेशी महिलांकडून देहविक्री व्यवसाय करवून घेण्याच्या गुन्ह्यात शहरातील संशयीत लॉजचा मालक संजय सुरेश सांडव (४७, रा.तेली आळी, कणकवली ) याला कणकवली पोलिसांनी बुधवारी रात्रीच्या सुमारास नागवे रस्त्यावरील रेल्वे पुलानजीक अटक केली.
ही कारवाई पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलिस नाईक रुपेश गुरव यांनी शिताफीने केली. संजय सांडव याला गुरुवारी कणकवली न्यायालयात हजर केले असता त्याला २५ जानेवारीपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
१५ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग दहशतवाद विरोधी पथकातील पोलिस कर्मचाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार दोन बांगलादेशी महिलांना कणकवली रेल्वे स्थानकाच्या बागेजवळ पकडण्यात आले. या दोन्ही बांगलादेशी महिलांकडे तपास करत असताना त्यांना वेश्या व्यवसाय करण्यासाठी शहरातील लॉजवर बोलावण्यात आल्याचे उघड झाले होते. त्यानुसार या गुन्ह्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५(१) व भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४३ ( ३ ) आणि ३ ( ५ ) हे वाढीव कलम समाविष्ट करण्यात आले.
यानुसार संशयित लॉजचा व्यवस्थापक ओंकार भावे आणि मालक संजय सुरेश सांडव या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. व्यवस्थापक ओंकार भावे याला कणकवली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला २४ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर लॉजचा मालक संजय सांडव हा दोन दिवस पोलिसांना चकवा देत होता. अखेर त्याला २२ जानेवारी रोजी कणकवली पोलिसांनी शिताफीने नागवे रस्त्यावर ताब्यात घेत अटक केली.
सांडव याला कणकवली न्यायालयात हजर करत तपासी अधिकारी मारुती जगताप यांनी पुढील कारणे देत पोलिस कोठडी मागीतली. आरोपी संजय सांडव याच्या संपर्कात बांगलादेशी महिला कशा आल्या ? त्यासाठी कोणाशी संपर्क केला ? लॉजचा व्यवसथापक ओंकार भावे आणि मालक संजय सांडव यांनी आरोपी बांगलादेशी महिला आणि अन्य महिलांना लॉजवर वेश्या व्यवसाय करण्यासाठी बोलावून घेऊन कुंटनखाना चालविला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींनी याआधी कोणत्या महिलांना आणून वेश्या व्यवसाय केलेला आहे? याचा सखोल तपासासाठी ५ दिवस पोलीस कोठडी मागितली.
सरकारी वकील आशिष उल्हाळकर यांनी सरकार पक्षाच्यावतीने युक्तिवाद केला. न्यायालयाने आरोपी संजय सांडव याला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्या दोन्ही बांगलादेशी महिलांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले असता सुनावणी अंती दोघींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.