Lok Sabha Election 2019 आघाडी, महायुतीला पर्याय वंचित आघाडी -महेश परूळेकर : प्रकाश आंबेडकर यांची पहिली सभा कुडाळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 06:09 PM2019-04-09T18:09:25+5:302019-04-09T18:14:06+5:30
संपूर्ण राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी प्रणित महाआघाडी व शिवसेना भाजप प्रणित महायुतीला सक्षम पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी ठरणार असल्याचा विश्वास भारतीय रिपब्लिकन बहुजन महासंघाचे
कुडाळ : संपूर्ण राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी प्रणित महाआघाडी व शिवसेना भाजप प्रणित महायुतीला सक्षम पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी ठरणार असल्याचा विश्वास भारतीय रिपब्लिकन बहुजन महासंघाचे व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ अॅड. प्रकाश आंबेडकर यांची पहिली सभा कुडाळ येथे २० एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी यांच्यावतीने मंगळवारी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रमुख तेजस पडवळ, महासचिव प्रमोद कासले, कुडाळ तालुकाध्यक्ष अंकुश जाधव, सावंतवाडी तालुकाध्यक्ष वासुदेव जाधव, मालवण तालुकाध्यक्ष भगवान जाधव, कुडाळ तालुक्याचे सचिव विजयकुमार जाधव आदीे उपस्थित होते.
परुळेकर म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांची महाआघाडी आहे. तसेच शिवसेना, भाजप व इतर पक्षांची महायुती या सर्वांना जनता कंटाळली असून, महाआघाडी व महायुती या दोन्हीला पर्याय म्हणून आता बहुजन वंचित आघाडी हा चांगला पर्याय जनतेसमोर असल्याचे त्यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यात विविध ठिकाणी लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार देण्यात आले आहे. कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून कुणबी समाजाचे नेते मारूती रामचंद्र जोशी यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांच्या प्रचारार्थ कोकणातील पहिली जाहीर प्रचार सभा आमचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथे २० एप्रिल रोजी होणार आहे.
सध्याचे खासदार व युतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यावर टीका करताना परूळेकर म्हणाले, राऊत हे हिंदुत्ववादी असून, त्यांनी जिल्ह्याचा काहीच विकास केला नाही. दलित समाजाचे अनेक प्रश्न त्यांनी चुकीच्या पद्धतीने हाताळले आहेत. दलित समाजाचा दलित वस्तीचा विशेष घटक निधी चुकीच्या पद्धतीने वापरला व त्याला जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांनीही सहकार्य केल्याचा आरोप परूळेकर यांनी केला.
मतदानावर बहिष्कार नको : परूळेकर
मच्छीमारांचे प्रश्न अजूनही प्रलंबित असून, वंचित बहुजन आघाडी पारंपरिक मच्छिमारांच्या बरोबर आहे. अनधिकृत मासेमारीला आमचा विरोध आहे. पारंपरिक मच्छिमारांची ताकद वाढावी, म्हणून आम्ही सदैव त्यांच्या सोबत यापुढेही राहणार असल्याचे परुळेकर यांनी सांगितले. आपल्या मताची ताकद ओळखा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मतदानाचा अधिकार वापरा. मात्र, मतदानावर बहिष्कार घालू नका, असे आवाहन परूळेकर यांनी मच्छिमारांना केले.