Lok Sabha Election 2019 प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी योजना--सुरेश प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 05:40 PM2019-04-19T17:40:10+5:302019-04-19T17:41:43+5:30

देशभरातील अनेक राज्यात प्रचारानिमित्त जाणे झाले. जनता नरेंद्र मोदीच पंतप्रधान झाले पाहिजेत असे म्हणत आहे.  देशाचा विकास होत असताना कोकणचा विकास होणे आवश्यक आहे

Lok Sabha Election 2019 Scheme for the development of each person - Suresh Prabhu | Lok Sabha Election 2019 प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी योजना--सुरेश प्रभू

 कणकवलीतील प्रचार सभेत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून आमदार वैभव नाईक, प्रदीप बोरकर, उदय सामंत, विश्वनाथ म्हाडेश्वर, प्रसाद लाड, विनोद तावडे, सुभाष देसाई, उध्दव ठाकरे, दीपक केसरकर उपस्थित होते. 

Next
ठळक मुद्देकणकवलीत महायुतीची प्रचारसभा; नेत्यांकडून विरोधकांचा समाचार

कणकवली : देशभरातील अनेक राज्यात प्रचारानिमित्त जाणे झाले. जनता नरेंद्र मोदीच पंतप्रधान झाले पाहिजेत असे म्हणत आहे.  देशाचा विकास होत असताना कोकणचा विकास होणे आवश्यक आहे. कोकणात मासळीवर प्रक्रिया करणारे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यासाठी चिन, जपान, कोरीया येथील उद्योजकांना आमंत्रित केले आहे. कोकणातील प्रत्येक व्यक्तीचा विकास करण्याची योजना आम्ही आखली आहे. असे प्रतिपादन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. 

शिवसेना, भाजपा, आरपीआय (आठवले गट), रासप महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा कणकवलीत गुरूवारी रात्री झाली. यावेळी प्रभू बोलत होते. सिंधुदुर्गात प्रक्रिया उद्योग नसल्याने येथील उत्पादने विदेशात निर्यात होत नाहीत. यावर आम्ही मार्ग शोधला आहे. त्यासाठी ठोस विकास आराखडा तयार केला आहे. यापुढील महिन्यात विदेशातील उद्योजक रत्नागिरी, सिंधुदुर्गात फळ आणि मासळीवर प्रक्रिया करणारे कारखाने उभारणार आहेत.

प्रक्रिया झालेली उत्पादने, बंदर आणि विमानाच्या माध्यमातून विदेशात निर्यात होतील आणि येथील प्रत्येक कुटुंबाला रोजगाराचे साधन मिळेल. लवकरच कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचे काम पूर्णत्वास जाईल. त्यानंतर वैभववाडी-विजयदुर्ग अशी रेल्वे लाईन टाकून संपूर्ण घाटमाथा किनारपट्टीशी जोडला जाईल असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना विनायक राऊत म्हणाले, राणे कुटुंबाने सिंधुदुर्ग जिल्हा अशांत केला. र्सिधुदुर्गची तुलना गडचिरोली जिल्ह्याशी होवू लागली. मात्र, २0१४ च्या निवडणुकीत कोकणातील जनतेने येथील राडा संस्कृती हद्दपार केली. या संस्कृतीने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे शांतता निर्माण करण्यासाठी राडा संस्कृती हद्दपार करूया.

पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, आम्ही गेल्या पाच वर्षात राणेंच्या चौपट, पाचपट निधी आणला. त्याची तुलना राणे यांनी आणलेल्या निधीशी होवू शकत नाही. आम्ही आणलेल्या विकासनिधीमधून ते विकासकामांची उद्घाटने करत आहेत. त्यामुळे त्यांना त्याबाबत विचारणा करा. यावेळी केसरकर राणे कुटुंबावर जहरी टीका करता त्यांना पोपटाची उपमा दिली.

यावेळी प्रमोद जठार म्हणाले, कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, विमानतळ, सागरी महामार्ग आदी कामे वेगाने होत आहेत. मोदी सरकारच्या दमदार कामगिरीमुळे कोकणच्या विकासाला गती मिळाली आहे.

संदेश पारकर म्हणाले, कणकवलीत खोटा आमदार आहे. प्रत्येक वेळी नवनवीन घोषणा केली जाते आणि जनतेला फसविले जाते. औषध आपल्या दारी, रिव्हर राफ्टींग, मोफत वायफाय आदी सर्व कार्यक्रम फेल गेले. तरीही आता ९00 कोटींचा कचरा प्रकल्प आणून जनतेची फसवणूक करीत आहेत.

चौकट

एलईडी फिशिंगला बसला पायबंद

उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यामुळेच सिंधुदुर्गातील एलईडी फिशींगला पायबंद बसला आहे.  एलईडी रोखण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गातील मच्छिमार उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांनी तातडीने यंत्रणा हलविली. केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांच्याशी संपर्क केला. राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम हे देखील मच्छिमारांच्या शिष्टमंडळासमवेत दिल्लीला गेले. त्यानंतर एलईडी फिशींगला पायबंद बसला आहे. गोव्यातील मोठे उद्योग लवकरच दोडामार्गमधील आडाळी एमआयडीसीमध्ये येणार आहेत.

राणेंवर टीका टाळली

यावेळी बोलताना शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, पुढचा पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत. त्यामुळे कोकणचा आवाज दिल्ली दरबारी पोहोचण्यासाठी युतीच्या मागे राहणे गरजेचे आहे. असे सांगताना शासनाच्या गेल्या पाच वर्षातील कामांचा आढावा घेतला. मात्र, संपूर्ण भाषणात त्यांनी नारायण राणे किवा स्वाभिमान पक्षावर कोणतीही टीका केली नाही.

 

Web Title: Lok Sabha Election 2019 Scheme for the development of each person - Suresh Prabhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.