रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणेंना उमेदवारी? राणेंनी घेतली फडणवीसांची भेट, शिवसेनेच्या भूमिकेकडेही लक्ष
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 28, 2024 09:02 PM2024-03-28T21:02:34+5:302024-03-28T21:04:22+5:30
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: लोकसभेच्या तळकोकणातील सर्वांत शेवटच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणूक रिंगणात उतरण्यासाठीच्या हालचालींना वेग घेतला आहे.
- महेश सरनाईक
सिंधुदुर्ग - लोकसभेच्या तळकोकणातील सर्वांत शेवटच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणूक रिंगणात उतरण्यासाठीच्या हालचालींना वेग घेतला आहे. शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. शिवसेनेकडून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचे नावे आघाडीवर असतानाच आता भाजपकडून नारायण राणेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजली. दरम्यान, नारायण राणे यांनी गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील सागर बंगल्यावर भेट घेतल्यामुळे हालचालींनी वेग घेतला असल्याचे बोलले जात आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतून मिळून बनलेल्या लोकसभा मतदारसंघात भाजपकडून नारायण राणे यांचे नाव उमेदवार म्हणून आघाडीवर असून, शिवसेनेकडून किरण सामंत यांनीही आपली दावेदारी कायम ठेवली आहे. तळकोकणात महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटला नसला तरीही लोकसभा निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक असलेले नारायण राणे यांनाच उमेदवारी मिळणार, अशा बातम्या गेल्या दोन दिवसांत मीडियात येत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वत: नारायण राणे यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गबाबत संभ्रम
शिवसेनेने लोकसभा निवडणुकीबाबत गुरुवारी सायंकाळी जाहीर केलेल्या आठ जणांच्या यादीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचा समावेश नव्हता. कारण, या ठिकाणचे विद्यमान खासदार विनायक राऊत हे ठाकरेंसमवेत एकनिष्ठ राहिल्याने ही जागा शिवसेनेकडून घेण्यासाठी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गेले दोन महिने जोरदार भूमिका घेतली होती. तळकोकणातील भाजपची ताकद वाढली असून, ही जागा भाजपच लढवेल यासाठी प्रयत्न केले. त्यातच शिवसेनेची पारंपरिक जागा असून, यासाठी किरण सामंत यांनी दावेदारी केली होती. त्यामुळे या जागेबाबत संभ्रमही निर्माण झाला होता.
दीपक केसरकरांच्या भूमिकेमुळे दुजोरा
दोन दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री तथा शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणेंना भाजपने राज्यसभेवर पाठविले नव्हते. कारण, त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी द्यायची असेल, अशी भूमिकाही मांडली होती. त्यामुळे नारायण राणे हेच लोकसभेचे उमेदवार असतील, याबाबतच्या शक्यता वाढल्या होत्या.