मळगावात लोकमाहिती अभियान
By admin | Published: December 23, 2015 11:35 PM2015-12-23T23:35:14+5:302015-12-24T00:54:24+5:30
बालाजी प्रभूगावकर यांची माहिती : २८ ते ३0 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी : केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहचविणे हा मुख्य उद्देश समोर ठेवून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या पत्र सूचना कार्यालय पणजी यांच्यामार्फत सावंतवाडी मळगाव येथे २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत लोकमाहिती अभियानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रसूचना कार्यालय पणजीचे सहाय्यक संचालक बालाजी प्रभूगांवकर यांनी दिली.तीन दिवसीय लोकमाहिती अभियानाची माहिती देण्यासाठी बुधवारी येथील पत्रकार कक्षात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समरजीत ठाकूर, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, सहाय्यक माहिती अधिकारी संध्या गरवारे अन्य उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमात गीत व नाटक प्रभाग, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने मनोरंजनातून प्रबोधन केले जाणार आहे. जयहिंद लोक नाट्यसंस्था व शाहिरी पोवाडा कलामंच सांगली हे बेटी बचाओ-बेटी पढाओ, स्वच्छ भारत अभियान, सार्वजनिक आरोग्य या विषयावर सादरीकरण करणार आहेत.
केंद्रशासनाकडून ज्या काही विविध योजना राबविल्या जात आहेत त्या योजनांची लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रतिनिधी देण्याचे काम यावेळी करण्यात येणार आहे. यामध्ये भारतीय स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया यांच्याकडून पंतप्रधान जनधन योजना, मुद्रा योजना, राष्ट्रीय ग्रामीण योजना, अटल पेन्शन योजना आदी योजनांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अनिल भंडारी तसेच महसूल प्रशासनाच्यावतीने आधारकार्ड काढण्याची योजनाही आखण्यात आली आहे. ज्या नागरिकांना अद्याप आधारकार्ड मिळालेले नाही त्यांना ताबडतोब आधारकार्ड मिळवून देण्याची व्यवस्था या अभियानादरम्यान करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
प्रभूगावकर : पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
बालाजी प्रभुगांवकर म्हणाले, २८, २९, ३० डिसेंबर २०१५ रोजी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयामार्फत आलेल्या पत्र सूचनेनुसार लोकमाहिती अभियानाचे आयोजन सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे करण्यात आले. २८ डिसेंबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी खासदार विनायक राऊत, खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह आदी उपस्थित राहणार आहेत.