लोकमान्य टिळकांचे बालपणातील दहा वर्षे रत्नागिरीत वास्तव्य!

By admin | Published: July 22, 2016 10:49 PM2016-07-22T22:49:34+5:302016-07-23T00:21:56+5:30

टिळकांचा जन्म रत्नागिरीतच : पाठ्यपुस्तकातील दापोली तालुक्यातील चिखलीचा उल्लेख वगळला; स्मारक पुरातत्व खात्याच्या ताब्यात--लोकमान्य टिळक जयंती विशेष

Lokmanya Tilak lived in Ratnagiri for ten years of childhood! | लोकमान्य टिळकांचे बालपणातील दहा वर्षे रत्नागिरीत वास्तव्य!

लोकमान्य टिळकांचे बालपणातील दहा वर्षे रत्नागिरीत वास्तव्य!

Next

मेहरुन नाकाडे -- रत्नागिरी --पाठ्यपुस्तकातून लोकमान्य उर्फ बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म दापोली तालुक्यातील चिखली गावात झाल्याचा उल्लेख आजवर सापडत होता. प्रत्यक्षात टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ साली रत्नागिरीत झाला. सध्या असलेल्या पाठ्यपुस्तकात ही सुधारणा करण्यात आली आहे. रत्नागिरी शहरातील गोरे यांच्या घरात टिळकांचा जन्म झाला. इतकेच नव्हे तर बालपणातील दहा वर्षे त्यांचे वास्तव्य रत्नागिरीत राहिले आहे. राज्य संरक्षित असलेले टिळक स्मारक सध्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात असून, पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.
लोकमान्यांचे वडील शिक्षक असल्याने त्यांची १८५५मध्ये रत्नागिरीत बदली झाली. सध्याची नगर परिषद शाळा क्रमांक २ येथे त्यांची नियुक्ती झाली होती. त्यामुळे गोरे नामक स्थानिकांनी आपले घर त्यांना भाड्याने दिले. पडवी, माजघर, देवघर, स्वयंपाकघर तसेच अन्य खोल्या मिळून खाली ९ व वरच्या मजल्यावर ३ असे दुमजली प्रशस्त घर दिले. माजघराला लागूनच असलेल्या खोलीत टिळकांचा जन्म झाला. त्यामुळे जन्मखोली म्हणून त्याचे जतन करण्यात आले आहे. टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक, शैलेश टिळक, मुक्ता टिळक यांनी टिळकांच्या काही वस्तू संग्रहालयाकडे जमा केल्या आहेत. एका काचेच्या कपाटात या वस्तू जपून ठेवल्या आहेत. मात्र, तत्पूर्वी टिळकांची पगडी तेवढीच या घरात होती.
टिळकांचे प्राथमिक शिक्षण शाळा क्रमांक २ मध्ये झाले. १८६६ साली टिळकांच्या वडिलांची बदली पुण्यात झाली. त्यामुळे संपूर्ण टिळक कुटुंब पुण्यात राहावयास गेले. त्यामुळे टिळकांचे वास्तव्य असलेल्या या घराला २०० पेक्षा अधिक वर्ष झाली आहेत.
महाराष्ट्र शासनाने १९७६मध्ये अंतिम अधिसूचना काढली. लोकमान्य टिळकांचे वास्तव्य असलेले घर ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आले. सुरूवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ते होते. मात्र, त्यानंतर १९८२-८३मध्ये पुरातत्व विभागाकडे याची जबाबदारी सुपूर्द करण्यात आली. तेव्हापासून हे स्मारक पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५.३०पर्यंत ते पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. आठवड्यातून एकदा सोमवारी हे स्मारक बंद ठेवण्यात येते.
एक एकर जागेत लोकमान्य टिळकांचे घर, स्मारकाच्या आवारात टिळकांचा पुतळा व त्यावर मेघडंबरी बांधण्यात आली आहे. स्मारकाच्या समोर शोभेची झाडे लावण्यात आली असून, स्मारकाच्या मागे पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासखोल्या बांधण्यात आल्या आहेत. येथे पर्यटकांसाठी प्रसाधनगृहदेखील आहे. आत्तापर्यंत लाखो पर्यटकांनी या स्मारकाला भेट दिली आहे. येथील टिळकांचा पुतळा १९९८-९९ साली बांधण्यात आला तर मेघडंबरी २००६-०७ साली उभारण्यात आली. पुरातत्व विभागाने या स्मारकाच्या स्वच्छतेसह डागडुजीसाठी खास कर्मचारी नियुक्त केले आहेत.


नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या भेटी
टिळक स्मारकाला पर्यटकांबरोबर नामवंत मंडळींनी भेटी दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कै. गोपीनाथ मुंडे, लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक, त्यांच्या पत्नी मुक्ता टिळक, डॉ. दीपक टिळक, खासदार नजमा हेपतुल्ला, योगगुरू रामदेवबाबा, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी यांनी भेटी दिल्या आहेत. पर्यटनाच्या हंगामामध्ये दररोज ७०० ते ८०० पर्यटक येथे भेट देतात. तर आॅफ सिझनमध्ये १५० ते २०० पर्यटक दररोज येथे भेट देतात.


काय पाहाल स्मारकात ?
टिळकांचा जन्म ज्या खोलीत झाला तेथे टिळकांची पगडी, उपरणे, मानपत्राची फे्रम, अडकित्ता, पानाची पिशवी (चंची), नाणी, टाग, दिवा (कंदील), नावाची पाटी आदी वस्तू काचेच्या कपाटात ठेवण्यात आल्या आहेत. स्वयंपाकघरात तांब्याचे तपेले ठेवण्यात आले आहे. टिळक कुटुंब राहात असलेले घर दुमजली प्रशस्त आहे. खाली ९ व वरच्या मजल्यावर ३ खोल्या आहेत.

Web Title: Lokmanya Tilak lived in Ratnagiri for ten years of childhood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.