तळवडेत लोकप्रतिनिधींमध्ये ‘डबलबारी’

By admin | Published: November 30, 2015 11:16 PM2015-11-30T23:16:13+5:302015-12-01T00:17:37+5:30

गुरूनाथ पेडणेकरांना धक्काबुकी : शिवसेना कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल ; वक्तव्य भोवले

Lokpal in 'Tablavade' | तळवडेत लोकप्रतिनिधींमध्ये ‘डबलबारी’

तळवडेत लोकप्रतिनिधींमध्ये ‘डबलबारी’

Next

सावंतवाडी : तळवडे येथील डबलबारी सामन्याच्या उद्घाटनासाठी आलेल्या शिक्षण व आरोग्य सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी शिवसेनेचे स्थानिक नेते प्रकाश परब यांच्यावर भाषणातून आगपाखड करताच शिवसेना-कॉँग्रेसच्या सदस्यांमध्येच भजनापूर्वीच ‘डबलबारी’ झाली. यावेळी पेडणेकर यांना धक्काबुक्की झाली. या प्रकरणानंतर तळवड परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. दरम्यान, याप्रकरणी सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी पोलिस स्थानकात बबलू काजरेकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांच्या विरोधात धक्काबुकी करण्यात आल्याची तक्रार दिली आहे.
तळवडे येथे तिरंगी डबलबारीचे आयोजन करण्यात आले होते. त्या डबलबारीचे उद्घाटन जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती गुरूनाथ पेडणेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी डबलबारी कार्यक्रमावेळी शुभेच्छापर भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी भाषणाच्या ओघात शेवटच्या काही ओळीत शिवसेनेचे स्थानिक नेते प्रकाश परब यांच्यावर गावात नको ती कर्म करीत असल्याचा आरोप केला. या आरोपानंतर परब यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले.
शिवसेना व काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी हमरातुमरीवर आले दोन्ही गट भिडले. यावेळी धक्काबुक्कीचाही पकार घडला. पण दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही बाजूचे कार्यकर्ते ऐकण्यास तयार नव्हते. अखेर सभापती गुरू पेडणेकर यांनी थोडीशी माघार घेत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वीच शिवसेना कार्यकर्त्यांनी सभापती गुरूनाथ पेडणेकर यांना धक्काबुक्कीही केली. यावेळी गोंधळाचा प्रसंग निर्माण झाला होता. अखेर त्यावर पडदा पडला. पण तळवडे येथे डबलबारी सामन्यापूर्वीच डबलबारीचा प्रसंग घडल्याने यांची चर्चा मात्र जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरू होती.
या तिरंगी डबलबारी सामन्याच्या कार्यक्रमाला अफाट गर्दी झाली होती. मातोंड, तळवडे, होडावडे, मळगाव, निरवडे, तुळस तसेच पंचक्रोशीतून हजारो भजनरसिक उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर उद्घाटनपर भाषण संपल्यानंतर एकच गोंधळ उडाला, आयोजकांचीही धांदल उडाली. राजकीय वाद करमणुकीच्या कार्यक्रमाला उमटले.
पण तळवडे गावाच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडला. या प्रकारानंतर तळवडे येथे तणावाचा प्रसंग निर्माण झाला होता. पोलिसांनीही परिस्थितीचा आढावा घेतला असून, रात्री उशिरापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता. (प्रतिनिधी)

पेडणेकर, जाधव यांची पोलिसात तक्रार
तळवडे येथे घडलेल्या प्रकारानंतर सोमवारी सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी शिवसेनेचे बबलू काजरेकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांविरोधात धक्काबुकीची तक्रार दिली असून, पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. तर कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या निकिता जाधव यांनीही सभापतींना धक्काबुकी केल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्या घरावर चाल करून आले. तसेच भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी उशिरापर्यंत कोणावर ही कारवाई केली नव्हती.


केसरकरांचा छुपा दहशतवाद दिसून आला : संजू परब
काँग्रेसवर दहशतवादाचे आरोप करणारे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तळवडेतील प्रकारानंतर कोण दहशतवाद पसरवतो हे बघावे. आमच्या पदाधिकाऱ्यांनी चुकीचे बोलले तर त्यांना अडवून धमकी देणे, हे कितपत योग्य आहे, असा सवाल करीत शिवसेनेचाच हा छुपा दहशतवाद असून सत्तेच्या जोरावर दीपक केसरकर हे पेरत आहेत, असा आरोपही परब यांनी यावेळी केला.
मी माफी मागितली नाही : गुरूनाथ पेडणेकर
तळवडे येथे घडलेल्या प्रकारानंतर सभापती गुरूनाथ पेडणेकर यांना विचारले असता ते म्हणाले,बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो पण मी कुणाची माफी मागितलेली नाही. कोण तरी चुकीची माहीती पसरवत आहे, असे सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी सांगितले.

Web Title: Lokpal in 'Tablavade'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.