खरंच कोकणी जनतेनं पुन्हा राणेंना नाकारलं ?

By वैभव देसाई | Published: May 28, 2019 06:53 AM2019-05-28T06:53:35+5:302019-05-28T07:00:29+5:30

23 तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि पुन्हा एकदा मोदींचा वारू चौफेर उधळला.

loksabha 2019 ratnagiri sindhudurg constituency vinayak raut v/s nilesh rane special report | खरंच कोकणी जनतेनं पुन्हा राणेंना नाकारलं ?

खरंच कोकणी जनतेनं पुन्हा राणेंना नाकारलं ?

Next

- वैभव देसाई
23 तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि पुन्हा एकदा मोदींचा वारू चौफेर उधळला. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपानं 200 किंवा 250 नव्हे, तर तब्बल 303 जागा जिंकल्या. त्यामुळे साहजिकच विरोधकांचा पुरता भ्रमनिराश झाला. विशेष म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निकालही धक्कादायक म्हणावा लागेल. कारण शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याबद्दल कोकणी जनतेत फारसा जनाधार असल्याचं निवडणुकीदरम्यान दिसलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या मनातही कुठे तरी पराभवाची पाल चुकचुकत होती. या लढतीत मोदी प्रभावामुळे भाजपाची मते धनुष्यबाणाला मिळाली आणि विनायक राऊत यांचा विजय सुकर झाला. शिवसेनेच्या विनायक राऊत यांना 4,58,022 एवढी मतं मिळाली असून, निलेश राणेंच्या पारड्यात 2,79,700 मते पडली. विनायक राऊत यांनी निलेश राणेंवर यंदा 1 लाख 78 हजार 322 मतांनी विजय मिळवला. निलेश राणे यांच्या पराभवामुळे ईव्हीएमबद्दलही संशयाचं भूत निर्माण झालंय. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक निकालात EVM मशिनमध्ये trending set केल्याचा आरोपही स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला. सुरुवातीपासूनच प्रत्येक फेरीत रत्नागिरी-सिंधुदुर्गात राऊत आणि राणे या दोन्ही उमेदवारांना ठराविक अंदाजात मते कशी काय मिळू शकतात?, असा प्रश्नही आता विचारला जाऊ लागला आहे.


नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएमबद्दल संशयाचं वातावरण समाजाच्या अनेक स्तरांमध्ये असल्याचा उल्लेखही केला. त्यामुळे साहजिकच या विजयाबद्दल एकूणच कोकणी जनता साशंक आहे. असो. पण रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निकालामुळे कोकणातली राजकीय समीकरणं आता बदलणार आहेत. आताच्या निवडणुकीत सेना-भाजपा युती विरुद्ध महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष म्हणजेच नारायण राणे अशी लढत दिसली. पण या लढतीत एका अर्थी राणेंचा कोकणी जनतेनं पराभव केल्याचंही मान्य करावं लागेल. कणकवली या विधानसभा मतदारसंघात वैभववाडी आणि देवगड या तालुक्यांचा समावेश आहे. कणकवली हा पूर्वीपासून राणेंचा अभेद्य असा बालेकिल्ला समजला जातो. युतीकडून नेहमीच या जागेवर भाजपाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतो, कारण या मतदारसंघात शिवसेनेची म्हणावी तशी ताकद नाही. कणकवली विधानसभा मतदारसंघातून यंदा स्वाभिमानला 40 हजारांचं मताधिक्य पडण्याचा अंदाज असताना निलेश राणेंना विनायक राऊतांपेक्षा फक्त 10 हजार 731 एवढंच मताधिक्य मिळालं. तर विनायक राऊत यांना चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ आणि सावंतवाडी या विधानसभा मतदारसंघांतून चांगलं मताधिक्य मिळालं. चिपळूणमध्ये राऊतांना 87,630 मते मिळाली तर निलेश राणेंना 30, 397 मतं मिळाली. त्यामुळे राऊतांनी चिपळूण विधानसभा मतदारसंघातून राणेंवर 57,233 मतांची आघाडी घेतली. तर रत्नागिरीत राऊतांना 1 लाखांचं मताधिक्य मिळालं, तर दुसरीकडे निलेश राणेंना 41 हजार एवढ्या मतांवरच समाधान मानावं लागलं.

कुडाळमधून निलेश राणेंना जास्त मते मिळाली नसली तरी सेनेच्या राऊतांना फक्त 63 हजार 909 मतांवर समाधान मानावं लागलं. या मतदारसंघात शिवसेनेचे वैभव नाईक आमदार असूनही शिवसेनेचं मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटलं. पण स्वाभिमान पक्षालाही अपेक्षित मते मिळालेली नाहीत. स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांचा हा गड समजला जातो. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातही गेल्या वेळेपेक्षा यंदा शिवसेनेचं मताधिक्य कमी झालेलं आहे. यंदा शिवसेनेला या मतदारसंघातून 74 हजार 233 एवढी मतं मिळाली. तर स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांना याच मतदारसंघातून 44 हजार 845 इतकी मतं मिळाल्यानं केसरकरांचा सावंतवाडीच्या जनतेवर असलेला प्रभाव हळूहळू कमी होत असल्याचंही चित्र समोर आलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काय होणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: loksabha 2019 ratnagiri sindhudurg constituency vinayak raut v/s nilesh rane special report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.