भरवस्तीतील बंद घरात दरोडा, इन्सुली-कुडवटेंब येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 02:51 PM2018-06-24T14:51:15+5:302018-06-24T14:51:55+5:30
इन्सुली-कुडवटेंब येथील विकास ज्ञानदेव केरकर यांचे भरवस्तीमधील घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी मागच्या दाराने प्रवेश करून हा धाडसी दरोडा टाकला.
बांदा : इन्सुली-कुडवटेंब येथील विकास ज्ञानदेव केरकर यांचे भरवस्तीमधील घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी मागच्या दाराने प्रवेश करून हा धाडसी दरोडा टाकला. ५५ हजार रुपयांच्या रोकडसह १ लाख ३५ हजार रुपयांचे दागिने असा मिळून एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चोरटे स्थानिक असण्याची शक्यता बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी व्यक्त केली. भर दिवसा व भरवस्तीमधील या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बांदा पोलिसांत तक्रार देण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली कुडवटेंब येथे विकास केरकर यांचे महामार्गाला लागूनच भरवस्तीत घर आहे. शनिवारी सकाळी ७.४५ वाजता पत्नी व दोन्ही मुलींसमवेत विकास केरकर हे कारवार येथे नातेवाईकाच्या लग्नाला जाण्यासाठी निघाले. तर त्यांचे वडील सावंतवाडी येथे भावाकडे गेले होते. विकास केरकर हे सायंकाळी ६.१५ च्या सुमारास घरी परतले.
घराचे कुलूप काढल्यानंतर मुख्य दरवाजाला आतून कडी घातलेली होती. त्यावरून घरात काहीतरी विपरीत घडल्याचा त्यांना संशय आला. मागच्या बाजूला गेले असता कटावणीच्या सहाय्याने दरवाजा तोडलेला दिसला. आणखी एक दरवाजा फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील तब्बल सात कपाटे फोडली. बेडरूमचा दरवाजा कुलूप तोडून फोडला. बेडरूममधील कपाट फोडून कपाटातील रोख ५० हजार रुपये लांबविले. तसेच २५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार (७५ हजार रुपये), १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन (३६ हजार रुपये) व प्रत्येकी ४ ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या (२४ हजार रुपये) असा एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
चोरीची माहिती विकास केरकर यांनी बांदा पोलिसांना दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम, मिशाळ, प्रितम कदम यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चोरटे स्थानिक असण्याची शक्यता निरीक्षक कळेकर यांनी व्यक्त केली.