मालवण तालुक्यातील नांदरूखमध्ये विकास निधीची लूट, ग्रामसेवकाची मनमानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 04:41 PM2017-11-30T16:41:56+5:302017-11-30T16:50:15+5:30
मालवण तालुक्यातील नांदरूख ग्रामपंचायतीवर जलस्वराज्य प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर गावाचा गाडा प्रशासन हाकत आहे. मात्र गावात सुरू असलेल्या विकास निधीची अधिकाऱ्यांकडून लूट केली जात असल्याचा आरोप नांदरूख ग्रामस्थांनी केला.
मालवण : मालवण तालुक्यातील नांदरूख ग्रामपंचायतीवर जलस्वराज्य प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर गावाचा गाडा प्रशासन हाकत आहे. मात्र गावात सुरू असलेल्या विकास निधीची अधिकाऱ्यांकडून लूट केली जात असल्याचा आरोप नांदरूख ग्रामस्थांनी केला.
ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाची मनमानी सुरू असल्याने ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीसह विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याची गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी नांदरूख ग्रामस्थांनी गाव बैठकीत केली.
नांदरूख गावात पार पडलेल्या विशेष बैठकीत नूतन सरपंच दिनेश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सुहास राणे, सलोनी पाटकर, वृंदा चव्हाण, विकास चव्हाण, सुनील चव्हाण, नंदकिशोर चव्हाण, गजानन चव्हाण, चंद्रकांत चव्हाण यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी गाव बैठकीत करण्यात आलेल्या आरोपांची कायदेशीर चौकशी होण्यासाठी गटविकास अधिकारी, सभापती यांना लवकरच लेखी निवेदन देण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
ग्रामपंचायत फंडाचा दर्जेदार कामे व योग्य विनियोग न करता शासनाच्या निधीचा गैरवापर करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी ग्रामस्थांनी एकवटण्याचा निर्धार केला आहे.
गोरगरिबांची दाखल्यांसाठी हेळसांड
नांदरूख गावात कार्यरत असलेल्या ग्रामसेवकाकडे नांदरूख व चौके या दोन गावांचा चार्ज आहे. ग्रामसेवकाकडून नांदरूख गावातील ग्रामस्थांना दाखला दिला जात नाही.
विविध दाखल्यांसाठी हेळसांड होत असल्याने गोरगरिब ग्रामस्थांना दाखल्यासाठी चौकेतील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. त्यामुळे मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामसेवकाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना तत्काळ बदली करून नांदरूख गावासाठी कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्यात यावा, अशीही मागणी करण्यात येणार आहे.
याबाबतही गटविकास अधिकारी, सभापती, तसेच जिल्हा परिषद सदस्यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे दिनेश चव्हाण यांनी सांगितले.
नांदरुख गावात ग्रामपंचायतीच्या फंडातून ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे काम सध्या सुरू आहे.यात इमारतीच्या प्लास्टर व प्लोरिंगसाठी वापरण्यात येणारी फरशी निकृष्ट दर्जाची आहे. अन्य साहित्य दर्जाहीन आहे. ही बाब बांधकाम अभियंत्यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी ती मान्य केली आहे. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसेवक यांचे लक्ष वेधले असता ग्रामस्थांनाच उद्धट उत्तरे दिली जातात.
ग्रामपंचायत बरखास्त असल्याने ग्रामसेवकाचा मनमानी कारभार सुरू आहे. या ग्रामसेवकाची बदली व्हावी, अशी चर्चा बैठकीत करण्यात आली. निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे.