फसव्या कॉल्सनी ग्राहकांची लूट
By admin | Published: February 13, 2015 10:19 PM2015-02-13T22:19:13+5:302015-02-13T22:54:33+5:30
ग्राहक अनभिज्ञ : आमिषांना बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतेय
चिपळूण : सध्या मोबाईद्वारे विविध आमिषे दाखवून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. याबाबत अनेक वृत्त प्रसिद्ध होत असताना मात्र ग्राहकांमध्ये फारशी जागृती नाही. अनेकजण आजही या फसव्या आमिषांना बळी पडत आहेत.
झटपट श्रीमंत होण्यासाठी किंवा आपल्या गरजा पूर्ण होण्यासाठी प्रत्येकजण पैशाच्या मागे आहे. त्यातच मोबाईलवर वेगवेगळे एस. एम. एस. किंवा कॉल्स येतात. त्या मधाळ बोलण्याला किंवा एस. एम. एस.ला ग्राहक भुलतात आणि पैसे भरतात. काही मिनिटांतच आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येते. ‘मग दातही आपलेच, ओठही आपलेच’ असल्याने इज्जत जाईल म्हणून गप्प बसण्याशिवाय पर्याय नाही. पोलिसांत तक्रार दिली, तर आपलेच पितळ उघडे पडणार म्हणून तिकडे कोणी फिरकत नाही.
मोबाईलवर केवळ ए. टी. एम.चाच क्रमांक नाही. तर कधी कधी टि.व्ही.बाबत, कधी मुलांच्या शिक्षणाबाबत किंवा एल. आय. सी.च्या बोनस बाबत चर्चा केली जाते. मोबाईलवरून धनादेश पाठवण्यासाठी पत्ता व अन्य तपशीलही विचारला जातो. अनेकांच्या पॉलिसी असल्याने त्याबाबत विश्वास ठेवला जातो. काहींचा क्लेम अडकलेला असल्याने ते या मोहजालात अडकतात. अनेकांना आजपर्यंत असे अनेक फोन आले आहेत. अनेकांची फसवणूक झाली, पण यात एलआयसीचा किंवा एजंटचा काही संबंध नसतो. लोक यात पुरते फसतात. अशा फसवणूकींपासून नागरिकांनी सावध राहायला हवे. आता आॅनलाईन फसवणुकीचे प्रकारही कमालीचे वाढले आहेत. या सर्व प्रकारात संबंधितांकडून अधिक चौकशी व्हायला हवी, असे सर्वांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)