लोरेतील पुलाला भगदाड
By admin | Published: September 25, 2016 11:18 PM2016-09-25T23:18:33+5:302016-09-25T23:18:33+5:30
शिवगंगा नदीच्या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक
वैभववाडी : शनिवारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने वैभववाडी तालुक्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, देवघर प्रकल्पाच्या विसर्गामुळे आलेल्या महापुरामुळे लोरेतील शिवगंगा नदीच्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे.
आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर यांच्यासमवेत पुलाची पाहणी केली, तर स्थानिक लोकप्रतिनिधींनीही पुलाला पडलेल्या भगदाडाची पाहणी करून तात्पुरती डागडुजी केली. त्यामुळे छोट्या वाहनांची जा-ये सुरू झाली आहे. मात्र, सध्या शिवगंगा नदीच्या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक असल्याने येथून वर्दळ टाळावी, असे आवाहन महसूल व पोलिस प्रशासनाने केले आहे.
वैभववाडी तालुक्यात दोन दिवस पडलेल्या पावसाची २७६ मि.मी. एवढी नोंद झाली आहे. शनिवारी तालुक्यात १६७ मिलीमिटर पाऊस झाला. त्यातच देवघर प्रकल्पातून विसर्ग सुरू केल्यामुळे शिवगंगा नदीकाठच्या गावांना चांगलाच तडाखा बसला. लोरे क्रमांक १ व २ तसेच गडमठमधील अनेक घरांमध्ये महापुराचे पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. पुरामुळे गडमठ पावलेवाडी येथील प्रवीण मोहिते यांच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. या भागाला पुराच्या पाण्याने वेढले असताना सुस्त असलेल्या महसूल प्रशासनाने महसूल नायब तहसीलदार जी. आर. गावित यांच्या उपस्थितीत रविवारी सकाळीच लोरे, गडमठमधील नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत.
पुलाच्या भगदाडाची लोकप्रतिनिधींनींकडून पाहणी
अतिवृष्टी आणि देवघर प्रकल्पाच्या विसर्गामुळे शिवगंगा नदीला आलेल्या महापुराने वैभववाडी-फोंडा मार्गावरील लोरेतील पुलाचा काही भाग वाहून गेल्यामुळे मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे शनिवार दुपारपासूनच या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रविवारी आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर यांच्यासमवेत पुलाच्या भडदाडाची पाहणी करून दुरुस्तीची तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना व्हटकर यांना दिल्या.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजू शेटये, माजी तालुका प्रमुख मंगेश लोके उपस्थित होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी अतुल रावराणे, बांधकाम सभापती दिलीप रावराणे, सभापती शुभांगी पवार, तुळशीदास रावराणे यांनी भगदाडाची पाहणी केली.
भगदाडाची दुरुस्ती; तरीही धोकादायकच : प्रशासन
शिवगंगा नदीवरील पुलाला पडलेल्या भगदाडात नदीतील दगड आणि वाळू टाकून दिलीप रावराणे यांनी भगदाडाची तात्पुरती दुरुस्ती केली. त्यामुळे छोट्या वाहनांची दुपारपासून वाहतूक सुरू झाली आहे. परंतु, भगदाड पडलेल्या जागेची स्थिती लक्षात घेता तात्पुरत्या दुरुस्तीवर विसंबून या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूल वाहतुकीस योग्य असा अहवाल येईपर्यंत शिवगंगा नदीच्या पुलावरून वाहतूक करू नये, असे आवाहन तहसीलदार संतोष जाधव व पोलिस निरीक्षक विश्वजित बुलबुले यांनी केले आहे. दरम्यान, वैभववाडी-फोंडा मार्गावरील एसटी वाहतूक तळेरेमार्गे वळविण्यात आली आहे.