सागाचे झाड घरावर कोसळून नुकसान, भातशेती, नाचणी शेती कुजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 02:05 PM2019-10-30T14:05:05+5:302019-10-30T14:15:42+5:30
गेले चार दिवस देवगड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊ स पडत आहे. पडेल येथील नामदेव शंकर बाणे यांच्या घरावर सागाचे झाड पडून नुकसान झाले आहे. दरम्यान चक्रीवादळामुळे देवगड बंदरात दाखल झालेल्या सुमारे ७०० हून अधिक नौका समुद्रातील वातावरण स्थिर होईपर्यंत बंदरातच आश्रयाला राहणार आहेत. शनिवारी दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला तरी तालुक्यात १८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. भातशेती व नाचणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
देवगड : गेले चार दिवस देवगड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊ स पडत आहे. पडेल येथील नामदेव शंकर बाणे यांच्या घरावर सागाचे झाड पडून नुकसान झाले आहे. दरम्यान चक्रीवादळामुळे देवगड बंदरात दाखल झालेल्या सुमारे ७०० हून अधिक नौका समुद्रातील वातावरण स्थिर होईपर्यंत बंदरातच आश्रयाला राहणार आहेत. शनिवारी दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला तरी तालुक्यात १८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. भातशेती व नाचणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेले काही दिवस वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ऐन दिवाळीच्या सणामध्येच नागरिकांच्या उत्साहावर विरजण टाकले आहे. शुक्रवारी रात्री पडेल येथील नामदेव बाणे यांच्या राहत्या घराच्या छपरावर सागाचे झाड पडून सुमारे सहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यातील अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. तसेच रस्त्यांच्या बाजूच्या संरक्षण भिंती व रस्त्यांच्या साईडपट्ट्या खचण्याचे प्रकारही घडले आहेत. पावसाचा जोर असाच चालू राहिल्यास मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
देवगड तालुक्यामधील बहुतांश गावांमध्ये आपल्या उदर निर्वाहापुरती भातशेती व नाचणी शेती केली जाते. सुमारे साडेपाच हजार हेक्टरवर भातशेती व दीड हजार हेक्टरवरती नाचणी शेती केली जाते. यावर्षी मुबलक प्रमाणात सुरुवातीपासून पाऊस पडत असल्याने भातपीक चांगले आले होते. मात्र, हातातोंडाशी आलेल्या भातपीक कापणीच्यावेळी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने भातशेतीचे व नाचणी शेतीचे पूर्णत: नुकसान झाले आहे.
तालुक्यातील मळेशेतीच्या ठिकाणी भातशेती कुजून गेल्याचे सांगण्यात येत आहे. तालुक्यातील विजयदुर्ग दशक्रोशीतील काही गावांमधील परिस्थितीही काहीशी अशीच आहे. अतिवृष्टीमुळे नाचणी शेतीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. उदरनिर्वाहासाठी केली जाणारी देवगड तालुक्यामधील भात व नाचणीशेतीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने येथील शेतकऱ्यांसमोर यावर्षी गंभीर समस्या निर्माण झाली आहे.