सावंतवाडीत सलून आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने दोन लाख रूपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 03:32 PM2019-02-22T15:32:42+5:302019-02-22T15:35:28+5:30
सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा येथील सदा पवार यांच्या हेअर कटिग सलूनला आग लागून दोन लाख रूपयांचे नूकसान झाले ही. घटना बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने दुकानात कोणीही नसल्याने मनुष्यहानी टळली. मात्र दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिक तसेच नगरपालिकेच्या अग्नीशामक बंबाने ही आग आटोक्यात आणण्यात आली. शार्टसर्किटने ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा येथील सदा पवार यांच्या हेअर कटिग सलूनला आग लागून दोन लाख रूपयांचे नूकसान झाले ही. घटना बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने दुकानात कोणीही नसल्याने मनुष्यहानी टळली. मात्र दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिक तसेच नगरपालिकेच्या अग्नीशामक बंबाने ही आग आटोक्यात आणण्यात आली. शार्टसर्किटने ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा येथे सदा पवार यांचे हेअर कंटिग सलून आहे. रात्री सदा पवार हे दुकान बंद करून घरी गेले होते. मात्र अचानक दुकानातून आगीचा भडका दिसू लागला. स्थानिकांनी पवार यांना बोलवून घेतले आणि दुकान उघडले. त्यावेळी दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसले. नगरसेविका समृध्दी विर्नोडकर यांनी लागलीच नगरपालिकेचा अग्नीशामक बंब मागवला. चारही बाजूने पाणी मारल्यानंतर आग आटोक्यात आली. रात्री उशिरापर्यंत दुकानातील सामान बाहेर काढून आग विझवण्याचे काम सुरू होते.
दरम्यान बुधवारी दुपारी पवार हे दुकान बंद करून गेले होते. त्यानंतर सायंकाळी दुकान उघडून ९ वाजण्याच्या अगोदर दुकान बंद केले होते. त्यामुळे दुकानात कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. दुकानाचे फर्निचर तसेच अन्य वस्तू जळून खाक झाल्या. साधारणत: दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. दुकानाचा पंचनामा रात्री उशिरा तसेच गुरूवारी सकाळी करण्यात आला. ही आग शार्टसर्किटनेच लागली असावी, असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला.
आग लागल्याचे समजताच नगराध्यक्ष बबन साळगावकर, स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब, नागरिक शिवशंभो विर्नोडकर, मंदार केरकर, सुदेश विर्नोडकर, सुरेश विर्नोडकर, बाळा कुडतरकर, प्रसाद कुडतरकर, संजू विर्नोडकर, विलास सावंत आदींसह नागरिकांनी धावाधाव करून आग आटोक्यात आणण्याबरोबरच दुकानातील सामान बाहेर काढण्यास मदत केली.
मोठा अनर्थ टळला
सदा पवार यांचे दुकान भर वस्तीत आहे. त्याच्या सलूनच्या दुकानाला लागून घरेही आहेत. पवार यांच्या दुकानाला आग लागलेली बघून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. दुकानच्या शेजारी असलेल्या पाटणकर यांच्या घरातील वृध्दा तसेच अन्य माणसांना तातडीने बाहेर काढले. मात्र सुदैवाने आग दुकानापुरतीच मर्यादित राहिली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नागरिकांनी धावाधाव केल्याने ही आग आटोक्यात आली.