भाविकांचा लोटला जनसागर

By admin | Published: November 2, 2016 12:01 AM2016-11-02T00:01:36+5:302016-11-02T00:01:36+5:30

ऐतिहासिक पालखी सोहळा : रामेश्वर-नारायणाच्या भेटीने ‘धन्य’ जाहली मालवणनगरी

Lotus people of the devotees | भाविकांचा लोटला जनसागर

भाविकांचा लोटला जनसागर

Next

सिद्धेश आचरेकर ल्ल मालवण
शिवकालीन ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर-नारायण यांचा पालखी प्रदक्षिणा सोहळा हजारो मालवणवासीय भाविकांच्या ‘याचि देही, याचि डोळा’ साक्षीने भक्तीमय वातावरणात पार पडला.
दिवाळीनिमित्त करण्यात आलेली विद्युत रोषणाई व यावर्षी प्रथमच भाविकांच्या मनोरंजनासाठी मिकी माऊस, हत्ती या शुभंकर प्रतिमा लक्षवेधी ठरल्या. सोमवारी रात्री उशिरापर्यंत हजारो भाविकांच्या गर्दीने मालवण बाजारपेठ फुलून गेली होती. मालवणसह जिल्ह्यातील भाविकांसाठी आणि चाकरमानी यांच्यासाठी अभूतपूर्व पालखी सोहळा चैतन्यदायी असतो.
दिवाळी पाडव्या दिवशी शहरातील प्रमुख उत्सव असलेल्या ग्रामदेवतांच्या पालखीचे दर्शन घेऊन ‘मालवणवासीय’ धन्य झाले.
मालवणातील ऐतिहासिक श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण पालखी सोहळ्यास सोमवारी दुपारी १ वाजता सुरुवात झाली. गावकर, मानकऱ्यांनी रामेश्वरासमोर श्रीफळ ठेवून गाऱ्हाणे घातल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात पालखी मालवणच्या परिक्रमेसाठी बाहेर पडली. देवतांच्या स्वागतासाठी भक्तांकडून ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. शिवकालीन पालखी आडवण येथील श्री देवी सातेरीची भेट घेऊन पुढे वायरी येथे श्री देव भूतनाथ देवालयामध्ये रामेश्वर नारायण देवतांची पालखी भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आली. यावेळी पालखीसोबत आलेल्या मानकरी प्रजाजनांना बोडवे-गावकर यांच्याकडून श्रीफळ भेट देऊन स्वागत करण्यात आले. भूतनाथ मंदिर येथे गाऱ्हाणे, देवतांचे दर्शन व देवभेटीचा सोहळा पार पडल्यानंतर देवतांची पालखी समुद्रीमार्गे मोरयाचा धोंडा, श्री देव दांडेश्वर येथे आली. दांडेश्वर मंदिर, श्री देवी काळबाई मंदिर, जोशी मांड येथे बहिण-भावांची भेट घेत पालखी बाजारपेठ रामेश्वर मांड येथे रात्री ८ वाजता दाखल झाली.
आमदार वैभव नाईक यांनी पालखी समवेत काहीकाळ परिक्रमा केली. त्यानंतर रामेश्वर मांड येथे रात्री पालखीचे दर्शन घेतले. यावेळी व्यापारीसंघाचे उमेश नेरुरकर, शिवसेनेचे बबन शिंदे, हरी खोबरेकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, हॉटेल बांबूचे संजय गावडे, बाळू तारी, नितीन तायशेटे, नानाशेठ पारकर, विजू केनवडेकर, पंकज साधये यांच्यासह विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, गावकर-मानकरी भाविक सहभागी होते. मालवणपालिकेची सुरु असलेली राजकीय धुळवड पाहता यावर्षीच्या पालखीला सोहळ्यात ‘राजकीय’ पदाधिकाऱ्यांची वर्दळ दिसून येत होती.
बाजारपेठत नाविन्यपूर्ण विद्युत रोषणाईने, फुलांची आरास करण्यात आली होती. बच्चे कंपनी वाळूचे किल्ले बनवून आपला आनंद द्विगुणीत करत होते. तर विविध देखावेही भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. वीज वितरणच्या कर्मचारीवर्गानेही अखंडित आपली सेवा बजावली.
दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ग्रामदेवतेला नतमस्तक होण्यासाठी समस्त मालवणवासीय श्री देव रामेश्वर-नारायण पालखीचे दर्शन घेण्यासाठी आतुरलेले होते. ठिकठिकाणी जंगी स्वागत झालेली पालखी बाजारपेठ येथील रामेश्वर मांड येथे लेकरांच्या दर्शनसाठी थांबली. यावेळी दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांनी दर्शन घेतले. रात्री १० वाजल्यानंतर पालखी बाजारपेठ, भरड, देऊळवाडामार्गे पुन्हा पालखी मंदिरात मार्गस्थ करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत भाविकांचा ओढा कमी झाला नव्हता. पोलीस प्रशासनकडून चोख बंदोबस्त करण्यात आला होता. मात्र एकदिशा वाहतूक सुरु ठेवण्यात आल्याने वाहतूक पोलिसांना वाहतूक कोंडी सोडविण्यास अडथळे येत होते.
मिकी माऊस, हत्तीने जिंकली मने
मालवण व्यापारी संघाच्यावतीने प्रथमच पालखी सोहळ्यात आकर्षण म्हणून मिकी माऊस, हत्ती या शुभंकर प्रतिमा अबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मिकी माऊस, हत्तीचे हस्तांदोलन, गळाभेट लक्षवेधी ठरत होत्या. त्यामुळे व्यापारी संघाचा हा अनोखा प्रयोग आकर्षक व यशस्वी ठरला.

Web Title: Lotus people of the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.