प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं... तरीही काहींचं थोडं वेगळं असतं!--वॅलेंटाईन डे स्पेशल
By admin | Published: February 13, 2015 10:22 PM2015-02-13T22:22:31+5:302015-02-13T22:55:04+5:30
भाड्याच्या खोलीत का असेना, परंतु संसार सुखाचा सुरू होता. पण, तेवढ्यात घात झाला. रत्नागिरीचे तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष जैतपाल यांचा अपघाती मृत्यू झाला,
रत्नागिरी : मणभर पोकळ शब्दांपेक्षा कणभर कृतीही दिलासा देते, हे गणित प्रेमात अधिक जिवंतपणा आणतं. ‘त्या’ दोघांचंही तसंच झालं, एका अपघातानं ‘त्या’ कर्त्या पुरूषाला अधू केलं, पण ‘ती’ धीरानं उभी राहिली, तिनं पतीलाच नाही तर पती, मुलं आणि एकूणच संसाराला आधार दिला, ‘तो’ आणि ‘ती’ यांची ही कहाणी तशी अनोखीच. प्रेमाचा झरा विवाहानंतर आटून जाण्याच्या कथा घडताना संसार उभी करणारी ‘ती’ आणि तिच्या या धडपडीचं कौतुक असलेला ‘तो’ थोडेसे दुर्मीळच...!
आरती विनायक बापट! रत्नागिरीच्या शेरेनाका येथे राहणाऱ्या! जयगड परिसरातील नामांकित बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स विनायक बापट यांच्या पत्नी! दोन ते पाच वर्षांची दोन मुलं गाठीला होती. भाड्याच्या खोलीत का असेना, परंतु संसार सुखाचा सुरू होता. पण, तेवढ्यात घात झाला. रत्नागिरीचे तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष जैतपाल यांचा अपघाती मृत्यू झाला, त्यांच्या गाडीत विनायक बापट होते. त्या अपघाताने जैतपाल यांना हिरावून नेले आणि बापट यांना गंभीर जखमी केले.
आरती यांना गंभीर अपघाताची माहिती मिळाली आणि त्या कोसळल्याच! बापट यांच्या डोक्याला एवढी इजा झाली होती की, डोक्याची कवटीही दिसत होती. त्यांना तत्काळ कोल्हापूरला दाखल करण्यात आले. जीवन-मरणाच्या रेषेवरच बापट उभे होते. आपल्या पतीला मृत्यूशय्येवर बघून त्या कोसळल्याच. त्या काळात विनायक बापट यांचे काका श्रीकांत बापट व अन्य नातेवाईक यांनी आरती यांना धीर दिला. नुसता मानसिक आधारच नाही; तर आर्थिक भारही पेलला. कोल्हापूरच्या किरण धर्माधिकारी यांनी ६ महिने त्यांचा ब्लॉक राहण्यासाठी बापट यांना दिला. बापट यांची परिस्थिती नाजूकच होती. शेवटी सासर-माहेरच्या नातेवाईकांनी दिलेल्या धीराने त्या उठल्या. पदराआड रडू आवरणारी बाई नाही तर ‘सावित्री’ बनायचं ठरवलं आणि मन घट्ट करून पतीची सेवा करण्याबरोबरच संसाराची जबाबदारीही पेलली.
आपल्या पत्नीनं हॉस्पिटलमध्ये मला उचलून घेण्याचीही जबाबदारी पार पाडली असल्याचे विनायक बापट सांगतात. यथावकाश बापट बरे झाले, जीवाला असलेला धोका टळला. आंघोळ घालण्यापासून ते अगदी अन्य कामेही आरती यांनीच मन लावून केली. पती अन् संसारात जीव अडकलेल्या आरती यांनी मन खंबीर करून स्वत:ला समजावलं. आपल्या विश्वाशी फारकत घ्यायची नाही, असं ठरवलं. त्याचदरम्यान, त्यांच्या एका मैत्रिणीनं त्यांना सहज विचारलं की, टू व्हिलर शिकवाल का? त्यांनी ‘हो’ म्हटलं. त्या मैत्रिणीला त्यांनी मनापासून शिकवलं आणि त्यांच्या मैत्रिणीनं केलेली ‘माऊथ पब्लिसिटी’ आज एवढी झाली आहे की, कोणत्याही महिलेला टू व्हिलर शिकायचं असेल तर आरती बापटच! दिवसभर बिझी राहणाऱ्या आरती यांच्या आयुष्यात असा काही दैवी प्रसंग आला असेल, असं क्षणभरही वाटत नाही. सर्वस्व गमावण्याची वेळ आलेल्या आरती यांनी पुढे होऊन संसार सावरला अन् वाढवला. मृत्यूशी भांडून आलेल्या त्यांच्या पतीसह त्यांचा सुखाचा संसार आता सुरू झाला आहे.
बापट यांना अपघात झाला, त्यावेळी त्यांची मुलं ३ ते ५ वर्षे वयोगटातील होती. आज ती खूप मोठी झाली आहेत. एक मुलगा बीएस्सी तर एक अकरावीत आहे. भाड्याने राहणाऱ्या बापट कुटुंबीयांच्या नावे आता स्वत:चा असा ‘पत्ता’ आहे.
बापट दांपत्याच्या प्रेमाचा उत्सव हा एका दिवसाचा नाही. कथा-कादंबरीत सांगतात तसा सात जन्मांचा असावा! (प्रतिनिधी)
आयुष्य म्हटले की, देव आणि दैवाचा खेळ हा सुरूच असतो. पण, कोणत्याही स्त्रीने खचून न जाता सावरले पाहिजे. संकट आले की, त्याला सामोरे जायचं बळही आपल्याला देवाने दिलेले असते. मीही हेच केलं. आपले दोन डोळे परस्परांना भेटत नाहीत. पण, एका डोळ्यात अश्रू उभे राहिले की दुसऱ्या डोळ्याला रडल्यावाचून राहावत नाही. पती-पत्नीचं नातं हे असं अभंग असावं आणि प्रेमाचा उत्सव हा आयुष्यभराचा असावा.
- आरती बापट, रत्नागिरी
मला आरतीसारखी पत्नी मिळाली, हे खरोखरच माझे भाग्य आहे. तिच्यामुळेच मी मृत्यूला हरवून परत आलो. माझ्या अपघातानंतर आरतीनं माझी मनापासून सेवा केली. मला छोट्या मुलासारखं सांभाळलं. सहा महिने मी बेशुध्द होतो, त्या काळातच नव्हे; तर त्यानंतरही तीन-चार वर्षे आंघोळ घालण्यापासून ते अगदी जेवण भरवण्यापर्यंत सारी कामे तीच करायची. मला तिचा खूप अभिमान आहे.
- विनायक बापट, रत्नागिरी
इच्छाशक्तीनं त्यांना जगवलं अन् पत्नीनं सावरलं...!
बापट यांचा सुखाचा संसार सुरू.
कोल्हापूरच्या किरण धर्माधिकारी यांनी सहा महिने त्यांचा ब्लॉक बापट यांना राहण्यासाठी दिला.
भाड्याने राहणाऱ्या बापट कुटुंबीयांची आता स्वत:ची वेगळी ओळख.
कोणत्याही महिलेला टू व्हिलर शिकायची असेल तर आरती बापटच!