अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ होण्याची शक्यता; कोकणासह मुंबईत कोसळणार पाऊस
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 5, 2023 02:34 PM2023-06-05T14:34:58+5:302023-06-05T14:35:23+5:30
सिंधुदुर्ग : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून येत्या दोन दिवसांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता हवामान ...
सिंधुदुर्ग : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून येत्या दोन दिवसांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि कोकणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यातील संपूर्ण किनारपट्टीवरील बळीराजा मोठ्या आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे. पाण्याची पातळी घटली असून अनेक भागात तीव्र पाणीटंचाई भासत आहे.
आज (५ जून,) अरबी समुद्रात चक्रीवादळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून पुढील ४८ तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्याने त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. म्हणजेच याचा अचूक अंदाज येण्यासाठी आणखी तासभर जावे लागणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले.
जर चक्रीवादळ तयार झाल्यास पश्चिम किनारपट्टीला समांतर उत्तरेच्या दिशेने सरकेल. परिणामी चक्रीवादळामुळे किनारपट्टीवर वारे वेगाने वाहतील. वादळामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात किनारपट्टीवर पाऊस पडेल आणि मान्सूनची प्रगती अधिक वेगाने होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.