अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 11:06 AM2022-08-13T11:06:28+5:302022-08-13T11:06:51+5:30
किनारपट्टीवर ताशी ४५ ते ६० कि.मी. प्रती तास वेगाने वारे वाहणार
सिंधुदुर्गनगरी : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून दि. १२ ऑगस्ट ते १४ ऑस्ट रोजी राज्याच्या किनारपट्टीवर ताशी ४५ ते ६० कि.मी. प्रती तास वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच दि. १२ ते १४ ऑगस्ट या कालावधीत समुद्र खबळलेला राहणार असल्याने या कालावधीत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी कळवले आहे.
तसेच या पार्श्वभूमीवर किनारी भागातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. शोध व बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी. शोध व बचाव गट कार्यरत ठेवावेत. जिल्हा नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहून कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास त्वरीत द्यावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.