स्नॅपडील लकी विनरच्या अमिषाने साडेतीन लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:24 PM2019-03-30T12:24:00+5:302019-03-30T12:26:48+5:30
आॅनलाईन वस्तू विक्रीची सेवा देणाऱ्या स्नॅपडील कंपनीचे तुम्ही' लकी विनर ' आहात. तुम्ही १२ लाख ८० हजार रूपयांच्या कारचे विजेते ठरला आहात. अशी बतावणी करून विनायक वामन पुजारे (३३, रा. वाघिवरे, गावठणवाडी) यांना तब्बल ३ लाख ५६ हजारांना अज्ञाताकडून गंडा घालण्यात आला आहे.
कणकवली : आॅनलाईन वस्तू विक्रीची सेवा देणाऱ्या स्नॅपडील कंपनीचे तुम्ही' लकी विनर ' आहात. तुम्ही १२ लाख ८० हजार रूपयांच्या कारचे विजेते ठरला आहात. अशी बतावणी करून विनायक वामन पुजारे (३३, रा. वाघिवरे, गावठणवाडी) यांना तब्बल ३ लाख ५६ हजारांना अज्ञाताकडून गंडा घालण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी विनायक पुजारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विनायक पुजारे हे एका कंपनीत औषध विक्री प्रतिनिधी(एम. आर.) म्हणून काम करतात. नेहमीप्रमाणे २५ मार्च रोजी डॉक्टरांकडे कंपनीच्यावतीने थेट औषध विक्री करण्याचे काम करत असताना त्यांना मोबाईलवर मनिष कुमार या हिंदी भाषीकाचा कॉल आला.
त्याने तुम्ही स्नॅपडीलचे लकी विनर ठरल्याची बतावणी विनायक पुजारे यांना केली. १२ लाख ८० हजार रूपयांच्या कारचे तुम्ही विजेता ठरल्याचेही सांगितले. काही वेळाने त्यांना त्या व्यक्तीचा पुन्हा फोन आला. तुम्हाला कार हवी की रोख रक्कम आवश्यक आहे? असे विचारले.
यावर विनायक पुजारे यांनी आपल्याला रक्कम द्या, असे सांगितले. त्यासाठी तुम्हाला कंपनीचे एमडी मनिष कुमार यांच्या खात्यावर १२ हजार ८०० रुपए प्रोसेसिंग फी भरावी लागले, अशी मागणी त्या व्यक्तीने केली. त्यानुसार पुजारे यांनी ती रक्कम बँक आॅफ इंडियाच्या खात्यातून संबधित व्यक्तीच्या खात्यावर भरली. रक्कम भरल्यानंतर दुपारी १ वाजता पुन्हा फोन आला. तुमच्या रक्कमेची पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे़.
दुसऱ्या दिवशी २६ मार्च रोजी विनायक पुजारे देवगड तळेबाजार येथे असताना पुन्हा फोन आला. तुम्हाला मिळणाऱ्या रक्कमेची तीन टक्के रक्कम मीर आरीफ यांच्या खात्यावर भरा. त्यानुसार पुजारे यांनी ३८ हजार ४०० रूपयांचा धनादेश दुपारी १२ वाजता बँकेत भरला. त्याच दिवशी पुन्हा ३.३० वाजता हिंदी भाषिकाचा फोन आला.
आपल्याला देत असलेल्या रकमेची प्रक्रीया सुरू आहे. लवकरच पैसे आपल्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. हे फोन वेगवेगळ्या नंबरवरून येत होते. काही कालावधीने पुन्हा फोन आला संबंधित रक्कमेची ७ टक्के जीएसटी भरावी लागणार आहे.
८९ हजार ६०० रुपये एवढी रक्कम बंटी यांच्या खात्यावर भरावी, अशा सूचना विनायक पुजारे यांना देण्यात आल्या. त्यानुसार ८९ हजार ६०० रूपयांचा धनादेश संबंधित खात्यावर सायंकाळी ४.३० वा़जता भरला. भरलेल्या धनादेशानुसार संबंधित संशयीतांच्या खात्यावर रक्कमा वर्ग होत होत्या. मात्र १२ लाख ८० हजार रूपयांची रक्कम पुजारी यांच्या खात्यावर जमा झाली नाही.
२७ मार्च रोजी सकाळी १० वाजता पुन्हा संबंधित हिंदी भाषिकाचा वेगळ्या नावाने फोन आला. रक्कम भरण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. आज तुमच्या खात्यावर जमा होईल. त्यामुळे प्रक्रीया शुल्क म्हणून २ लाख १५ हजार २०० रुपये नवीन यांच्या खात्यावर भरा. त्यानुसार विनायक पुजारे यांनी दुपारी २ वाजता २ लाख १५ हजार २०० रूपयांची रक्कम जमा केली. त्यामुळे २५ मार्च ते २८ मार्च या कालावधीत मोबाईलवर आलेल्या कॉलवरून मिळालेल्या अमिषाने विविध ४ खात्यांवर ३ लाख ५६ हजार रूपयांची रक्कम पुजारे यांनी भरली.
मात्र बक्षीस लागलेली रक्कम न देता त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार विनायक पुजारे यांनी दिली.त्यानुसार कणकवली पोलीस ठाण्यात संबंधितावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी करीत आहेत.