सिंधुदुर्गात पुन्हा लम्पीचा उद्रेक, पशुपालक चिंतित
By ओमकार संकपाळ | Published: August 8, 2023 01:17 PM2023-08-08T13:17:50+5:302023-08-08T13:18:09+5:30
जुलै महिन्यात दहा जनावरांचा मृत्यू
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात लम्पी आजाराने पुन्हा डोके वर काढले असून, जिल्ह्यातील काही भागांत या आजाराचा उद्रेक झाला आहे. सध्या ३०० जनावरे या आजाराने बाधित असून, त्यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचार सुरू आहेत. तसेच जुलै महिन्यात तब्बल दहा जनावरांचा मृत्यूदेखील या आजाराने झाला आहे. पशुसंवर्धन विभागाने लसीकरणावर भर दिला असून, आतापर्यंत ५५ हजार गो-वर्गीय जनावरांना लम्पीची लस देण्यात आली आहे.
नोव्हेंबर २०२२ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला होता. यावेळी जिल्ह्यातील अनेक भागांतील जनावरे लम्पी या रोगाने आजारी पडली होती; मात्र, अन्य जिल्ह्यांत या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या जिल्ह्याच्या आधीपासून असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील गो-वंशीय जनावरांना लम्पी प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरुवात केली होती.
जिल्ह्यातील २ लाख ५० हजार जनावरांपैकी १ लाख ५ हजार गो-वंशीय जनावरांना ही लस देण्यात आली होती. असे असले तरी नोव्हेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत जिल्ह्यातील १२३ जनावरांचा लम्पी आजाराने मृत्यू झाला होता; मात्र, आता पुन्हा या आजाराने जिल्ह्यात डोके वर काढले असून, पशुपालक चिंतित झाले आहेत.
एका महिन्यांत दहा जनावरांचा मृत्यू
गतवर्षी या लम्पीमुळे जिल्ह्यातील १२३ गो-वंशीय जनावरांचा मृत्यू झाला होता. तर चालू वर्षात आतापर्यंत १९ जनावरांचा मृत्यू झाला असून, यातील तब्बल दहा जनावरांचा मृत्यू हा जुलै या एका महिन्यात झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला असून, गो-वंशीय जनावरांचे लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे.
लहान वासरांना धोका अधिक
जिल्ह्यात लम्पी साथीचा उद्रेक होत आहे. गेल्या वर्षी या आजाराची लस अन्य जनावरांना दिली असल्याने त्या जनावरांस या आजाराचा धोका कमी आहे; मात्र, जी जनावरे गाभण होती. त्यांच्यापासून निर्माण झालेल्या लहान वासरांना या आजाराचा धोका सर्वांत जास्त असून अशा वासरांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून येत आहेत.
जिल्ह्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या जनावरांना लम्पी प्रतिबंधात्मक लस द्यावी. काही पशुपालक ही लस देण्यास नकार देत आहेत; मात्र, त्यांनी तसे न करता जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही लस द्यावी. - डॉ. अतुल डांगोरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, सिंधुदुर्ग