वैभववाडीत पाठिंबानाट्य
By admin | Published: October 27, 2015 10:15 PM2015-10-27T22:15:04+5:302015-10-27T23:56:58+5:30
नगरपंचायत निवडणूक : विकास आघाडीच्या दोघांचा काँग्रेसला पाठिंबा; एकाचे घूमजाव
वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्यावरून मंगळवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. सकाळी काँग्रेस कार्यालयात विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे जाहीर करीत आमदार नीतेश राणे यांनी त्यांचा सत्कार केला. मात्र, सायंकाळी त्यांच्यापैकी एकाने घूमजाव करीत राणेंनी सत्कारासाठी बोलावून पाठिंब्याचे नाटक केल्याचा आरोप नगरसेविका सुचित्रा कदम यांचे वडील रत्नाकर कदम यांनी पत्रकार परिषदेत केला.
विकास आघाडीत फूट पाडण्यापेक्षा गावातील चार प्रभागांत पक्षाच्या चिन्हावर आपले उमेदवार निवडून आणून दाखवावेत, असे आव्हान विकास आघाडीने काँग्रेसला दिले आहे.
नगरपंचायतीच्या प्रभाग १५ मधून रवींद्र रावराणे व प्रभाग १६ मधून सुचित्रा कदम विकास आघाडीतर्फे बिनविरोध निवडून आले आहेत. यापैकी रवींद्र रावराणे व सुचित्रा कदम यांचे वडील रत्नाकर कदम यांनी नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आणि दोघांचा सत्कार केला. यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित माजी उपसरपंच व वाभवे गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते गंगाराम ऊर्फ दादा रावराणे यांनी या द्वयींचा काँग्रेसला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.
विकास आघाडीच्या बिनविरोध नगरसेवकांच्या भूमिकेबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ होते; तर युतीच्या गोटात सन्नाटा पसरला होता. मात्र, रावराणे व कदम यांच्या पाठिंब्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु काँग्रेसचा उत्साह दीर्घकाळ टिकला नाही. सायंकाळी चारच्या सुमारास सुचित्रा कदम यांच्या निवासस्थानी विकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली. आपणास नीतेश राणे यांनी सत्कारासाठी बोलावून घेतले होते. यावेळी तिथे गेल्यावर त्यांनी आमचा पाठिंबा जाहीर केला. मात्र, आम्ही काँग्रेससोबत नसून विकास आघाडीचेच आहोत, असे सुचित्रा कदम यांचे वडील रत्नाकर कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
रंगत वाढली
विकास आघाडीच्या बिनविरोध नगरसेवकांच्या पाठिंबा नाट्यामुळे दिवसभर शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. दरम्यान, विकास आघाडीचे दुसरे बिनविरोध नगरसेवक रवींद्र रावराणे यांच्याशी दुपारनंतर संपर्क झाला नसल्याचे विकास आघाडीने स्पष्ट केले. या नाट्यमय घडामोडींमुळे नगरपंचायत निवडणुकीत रंगत वाढणार आहे.